भाजपाला पडणार ७० टक्के खिंडार ?
जळगाव (प्रतिनिधी) : माजी मंत्री तथा खान्देशातील भाजपचे जेष्ठ नेते एकनाथराव खडसे हे गुरुवारी २२ ऑक्टोबर रोजी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अधिकृतपणे कन्या तथा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या चेअरमन रोहिणीताईंसह प्रवेश करणार आहेत अशी माहिती आता सोशल मीडियासह समर्थकांकडून बाहेर येऊ लागली आहे. याबाबतची अधिकृत माहिती स्वतः खडसे व रोहिणीताई देत नसले तरीही, खडसे यांनी मात्र “काही गोष्टी मलाही माहिती नसतात” असे सूचक वक्तव्य केले आहे. मुंबईला बुधवारी जाणार असल्याच्या वृत्ताला खडसेंनी नकार दिला असला तरीही कार्यकर्ते जळगावातून मुंबई येथे रवाना होणार असल्याचे सांगत आहेत. खडसेंच्या पक्षांतरामुळे भाजपाला जिल्ह्यात ७० टक्के खिंडार पडणार असून खान्देशात भाजप खिळखिळी होण्याची चिन्हे आहेत.

अनेक दिवसांपासून एकनाथराव खडसे यांच्या पक्षांतराच्या चर्चा रंगल्या आहेत. सोमवारी शरद पवार यांनी खडसेंना भाजपने योग्य न्याय दिला नाही असे सांगत जेथे नोंद घेतली जाते, तेथे जावे का असे एखाद्या पक्षाबद्दल खडसे यांना वाटत असेल तर चांगलेच आहे, असे म्हणत खडसेंच्या प्रवेशासाठी एक प्रकारे हिरवा कंदील दाखविला होता. मंगळवारी जळगाव जिल्ह्यात सोशल मीडियातुन गुरुवारी खडसेंचा राष्ट्रवादीत प्रवेश नक्की अशी चर्चा सुरु झाली. त्यानुसार समर्थकांशी संपर्क साधला असता त्यांनी बुधवारी मुंबईला जायचे असल्याचे सांगत गुरुवारी खडसे साहेब नक्की राष्ट्रवादीत जातील असे सांगत आहेत. त्यामुळे एकनाथराव खडसे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
याबाबत एकनाथराव खडसे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, काही गोष्टी मलाही माहित नसतात. टीव्हीवर पाहून माहिती पडतात. काही माहिती मिळाली तर सांगू शकेन. बुधवारी मुक्ताईनगरमध्येच आहेत, असे म्हणत त्यांनी राष्ट्रवादी प्रवेशाची माहिती अद्यापही वेटिंगवर ठेवली आहे. दुसरीकडे भाजप मात्र व्हेंटिलेटरवर जाण्याची शक्यता आहे. खडसेंच्या प्रवेशाने बालेकिल्ला असलेल्या भाजपाला ७० टक्के खिंडार पडण्याची शक्यता वर्तविली जात असून जिल्ह्यातील मनपा, नपा, ग्रामपंचायती येथे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या चेअरमन ऍड. रोहिणीताई खडसे म्हणाल्या की, अजून काही नक्की नाही. काही असेल तर नक्की अधिकृतपणे कळवू, मुंबईचे काही नाही असे म्हणत ऍड. खडसे यांनी राष्ट्रवादी प्रवेशाविषयीचे वृत्त अजून लांबणीवरच ठेवले आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्ह्यात खडसेंच्या नेतृत्वाखाली आणखी बळकट होऊन बालेकिल्ला होण्याची शक्यता आहे.







