जळगाव (प्रतिनिधी) – येथील एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या आवारात रविवारी दुपारी चक्क वाळूने भरलेले डंपरच चोरीला गेल्याची घटना घडली होती. मात्र, पोलिसांनी तपास चक्रे फिरवीत डंपरची माहिती काढली. त्यानुसार सोमवारी दोघेही संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे.
तहसीलदार यांच्या पथकातील आव्हाण्याचे तलाठी मनोहर बावसकर, ममुराबाद्चे तलाठी वीरेंद्र पालवे यांनी विटनेर शिवारात वाळूची अवैधरित्या वाहतूक करीत असतांना डंपर क्रमांक एम. एच. ४६. एफ. ३७६४ हे पकडले होते. दंडात्मक कारवाई होई पावेतो हे डंपर एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या आवारात लावले होते. महसूलच्या पथकाने पकडलेले 1 ब्रॉस वाळूने भरलेले हे डंपर एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या आवारातून चोरी झाल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी १८ रोजी उघडकीस आला होता. दरम्यान, याप्रकरणी सोमवारी अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या काही तासातच एमआयडीसी पोलीस स्टेशन परिसरात हॉटेल कमल पॅराडाईसच्या मागे संशयितांनी लपवून ठेवलेले चोरीचे डंपर पोलिसांनी हस्तगत केले आहे. मात्र, त्यातून वाळू लंपास केली. तसेच संशयित भुषण मंगल धनगर रा. वैजनाथ ता. एरंडोल व रोहित विजय सोनवणे रा. पाळधी, रेल्वेस्टेशन या दोघांना अटक केली आहे.
सदरचे डंपर हे संशयितांनी दुसरी चावी आणून पळवून नेले असल्याचे लक्षात आले आहे. त्यांना मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, रामकृष्ण पाटील, सचिन पाटील, मुकेश पाटील, गोविंदा पाटील, इमरान सैय्यद, मुदस्सर काझी, हेमंत कळसकर, चंद्रकांत पाटील यांनी सदरचे डंपर जप्त केले.