जळगाव(प्रतिनिधी) – महाराष्ट्र हॉकी संघटनेच्या (एमएचए) अध्यक्षपदी माजी राष्ट्रीय हॉकीपटू इक्राम खान यांची तर, सचिवपदी हनिफ शेख यांची निवड करण्यात आली. रविवारी झालेल्या निवडणूकीत संघटनेची नवीन सदस्यांची ही नियुक्ती करण्यात आली आहे.
यावेळी राज्यस्तरीय हॉकी क्रीडा स्पर्धा प्रमुख म्हणून प्रा.आसिफ खान जळगांव व शेख मोहसिन धुळे यांची निवड करण्यात आली आहे.
गेल्या सहा वर्षात पहिल्यांदाच निवडणूक घेऊन ही नवी कार्यकारीणी अस्तित्वात आली आहे. न्यायालयीन लढाईनंतर भारतीय हॉकी संघटनेची मान्यता रद्द होऊन हॉकी इंडिया ही संघटना अस्तित्वात आली. हॉकी इंडियाने महाराष्ट्र राज्यातील हॉकी खेळाचा भार उचलण्यासाठी हॉकी महाराष्ट्रची नियुक्ती केली आहे. संघटनेतील सर्व सदस्यांची बिनविरोध निवड झाली आहे.
महाराष्ट्र राज्यातील शहर, राज्य आणि तालुकास्तरावर हॉकी क्रिडाप्रकाराचा प्रचार आणि विकास करण्याचे आमचे मुख्य उद्दीष्ट्य असल्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष इक्रम खान यांनी सांगितले.
राज्याच्या हॉकी खेळाला ऐतिहासिक इतिहास असून माजी उद्योगपती जेआरडी टाटा आणि एनडी नगरवाला यांनी हॉकी संघटनेची स्थापना देश स्वतंत्र होण्यापूर्वी १९४५ रोजी केली होती. देश स्वतंत्र झाल्यानंतर जेआरडी टाटा यांनी स्वतः पुढाकार घेत इंडियन हॉकी फेडरेशन, या राष्ट्रीय कार्यकारीणी स्थापना केली होती.
कोविड-१९ या महामारीच्या संपुष्टानंतर मैदानावर प्रत्यक्ष खेळ सुरू करण्याआधी विविध राष्ट्रीय संघटनांकडून एमएचए प्रथमतः मान्यताप्राप्त करून घेणार आहे. राज्याच्या नवीन कार्यकारीणी निवड होणे, ही फार महत्वाची गोष्ट असल्याचे खान यांनी स्पष्ट केले. राज्यातील हॉकीप्रेमींना एकत्र आणून या खेळाला मुख्य प्रवाहात आणण्याचे काम आम्ही करणार आहोत.
११७ वी आगाखान करंडक हॉकी स्पर्धेची इक्राम खान यांनी घोषणा केली. ही स्पर्धा एमएचएच्या मान्यतेखाली जळगांव येथे आयोजित करण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले. डिसेंबर २०१९ मध्ये झालेल्या ११६ व्या आगाखान स्पर्धेत जळगांव संघाने नाशिक रेंज पोलिस संघाचा पराभव करून विजेतेपद मिळवले होते.
महाराष्ट्र हॉकी संघटना कार्यकारणी – अध्यक्ष- इक्राम खान, उपाध्यक्ष- गुलाबराव पोळ (आयपीएस), आझम पानसरे, जे.एस. कुचेकर, सतिश पवार,सचिव- हनिफ शेख, सह-सचिव- विजय पाटील,खजिनदार- चंद्रकांत सोळंखे, सह-खजिनदार- इस्माईल समडोळे, सह-खजिनदार- इस्माईल समडोळे;राज्यस्तरीय हॉकी क्रीडा स्पर्धा प्रमुख म्हणून प्रा.आसिफ खान जळगांव व शेख मोहसिन धुळे यांची निवड करण्यात आली आहे.