नगरसेविका गायत्री शिंदे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
जळगाव (प्रतिनिधी) : येथील शिवाजी नगर भागात अवैध धंदे, गुन्हेगारी वाढत असून यामुळे नागरिकांचे आयुष्य धोक्यात आले आहे. म्हणून शिवाजी नगर परिसरात स्वतंत्र पोलीस चौकीची निर्मिती करण्यात यावी या मागणीचे निवेदन नगरसेवक गायत्री शिंदे आणि नागरिकांनी बुधवारी १४ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.

निवेदनात म्हटले आहे कीं, वाढती लोकसंख्या आणि त्या अनुषंगाने वाढत चाललेली गुन्हेगारी यामुळे पोलीस कर्मचारी अपुरे पडत आहेत. एखादी अप्रिय घटना घडल्यास शिवाजी नगर परिसरातील नागरिकांना शहर पोलीस स्टेशनला येऊन तक्रार द्यावी लागते. मात्र पोलीस येण्याआधी गुन्हेगार फरार होतात. शिवाजी नगर परिसर हा रेल्वे स्टेशनला लागून आहे. सामाजिक व राजकीय दृष्टीने हा परिसर संवेदनशील बनत चालला असून गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे. पोलिसांचे मनुष्यबळ देखील अपुरे पडत असून सणांच्या वेळी बंदोबस्त ठेवणे, रात्रीची गस्त, गुन्ह्यांचा तपास, कायदा सुव्यवस्था ठेवणे हे काम करताना पोलिसांची दमछाक होत आहे, त्यामुळे शिवाजी नगरसाठी स्वतंत्र पोलीस स्टेशन असावे अशी मागणी देखील निवेदनात करण्यात आली आहे.







