श्रीनगर (वृत्तसंस्था) – पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधून जमिनीवरून हवेत मारा करू शकणाऱ्या क्षेपणस्त्र प्रक्षेपणांचे तळ चीन विकसित करत असल्याच्या वृत्ताच्या पार्श्वभुमीवर लष्कराच्या एका वरिष्ठ कमांडरने अशी कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याचे स्पष्टिकरण दिले आहे.
पाकिस्तान आणि चीनमध्ये लष्करी उपकरणांबाबत सहकार्य आहे. मात्र क्षेपणास्त्र प्रक्षेपणासाठी चीनकडून तांत्रिक सहकार्य दिले जात असल्याची कोणतीही लक्षणे नसल्याचे श्रीनगरस्थित चिनार कॉर्प्सचे कमांडर लेफ्टनंट जनरल बी.एस. राजू यांनी सांगितले.
भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये लडाखमध्ये सातत्याने तणावाची स्थिती आहे. त्याच तणावादरम्यान पाक व्याप्त काश्मीरमध्ये जमिनीवरून हवेत मारा करू शकणाऱ्या क्षेपणास्त्रांच्या प्रक्षेपणासाठीचा तळ उभारण्यासाठी चीन पाकिस्तानला मदत करत असल्याचे वृत्त पुढे आले होते.
चीन आणि पाकिस्तानचे सैनिक आपल्या भूभागात संयुक्तपणे गस्त घालत असल्याचेही आढळून आले होते. मात्र क्षेपणास्त्र प्रक्षेपण तळासाठी चीनच्या मदतीची कोणतीही लक्षणे नसल्याचे जनरल राजू यांनी म्हटले आहे.
चीनकडून पाकिस्तानला मदत केली जाणे अथवा पाकिस्तानकडून चीनला मदत केली जाण्याबाबतच्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत. मात्र तशी कोणतीही लक्षणे नाहीत. मात्र चीन-पाकिस्तान आर्थिक कोरिडोरमुळे पाकिस्तानमध्ये चिनी सैनिक आहेत. लष्करी उपकरणांपुरती मदतही केली जाते. मात्र तांत्रिक मदत केली जात नाही, असे ते म्हणाले.
पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील लासादान्ना धोकजवळ पौली पीर येथे पीपल्स लिबरेशन आर्मी आणि पाकिस्तान सैन्याच्यावतीने क्षेपणास्त्र प्रक्षेपण केंद्र उभारण्याचे काम सुरू आहे, असे वृत्त पुढे आले होते.