नवीदिल्ली (वृत्तसंस्था) – पाकिस्तानी लष्कराचा पाठिंबा असणाऱ्या दहशतवादी संघटनांकडून प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरून भारतात शस्त्रे पाठवण्याचा कट लष्कराने उधळून लावला. एके रायफलीसंह शस्त्रांचा मोठा साठा जप्त केला. ही कारवाई जम्मू काश्मीरच्या केरन क्षेत्रात घडली.
काशिंगंगा नदीच्या पात्रातून ट्यूब बांधून काही सामानाची ने-आण करण्याचा प्रयत्न दोन-तीन जण करत असल्याचे गस्तीवरील लष्कराच्या जवानांच्या लक्षात आले. ही हालचाल पाहताच जवानांनी त्या दिशेला धाव घेतली. त्यावेळी चार एके 74 रायफली, आठ मॅगॅझिन्स आणि 240 गोळ्या असा दोन पिशव्यात लपवलेला शस्त्रसाठा हस्तगत करण्यात आला. त्यामुळे या भागाची नाकाबंदी करून आणखी काही आक्षेपार्ह आढळते का? याची शोधमोहीम सुरू करण्यात आली.
पाकव्याप्त काश्मीरमधून दहशतवाद्यांना शस्त्रे पाठवण्याचा आणखी एक प्रयत्न झाला. तो सतर्क जवानांनी हाणून पाडला. पाकिस्तानच्या या कारवायांत खंड पडलेला नाही, असे चिनार कॉर्पस्चे लेफ्ट. जनरल बी. एस. राजू यांनी सांगितले. ते म्हणाले, टेहळणीच्या उपकरणांच्या सहाय्याने आमच्या दक्ष जवानांनी पाकिस्तानचा हा डाव हाणून पाडला. भविष्यात असे प्रयत्न आम्ही हाणून पाडू, असे राजू यांनी स्पष्ट केले.
केरन, तंगधर या जम्मूतील भागात आणि पंजाबातही असे प्रयत्न करण्यात आले होते. ते हाणून पाडण्यात आले. काश्मीरच्या नागरिकांना दहशतवादी कारवायांत गुंतवून ठेवणे हा त्या मागचा उद्देश आहे. मात्र ही शस्त्रे आधीच पकडली गेल्याने किमान जीवितहानी होईल. दहशतवाद संपवायचा असेल तर लोकांचे सहकार्य लागेल, असे ते म्हणाले.