आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबाला
‘उभारी’ देण्यासाठी शासनाचा उपक्रम
जळगाव (प्रतिनिधी) – आयुष्यात कधीच कल्पना केलेली नसतांना थेट जिल्हाधिकारीच घरी भेटीला आले. यामुळे भेटीचे ” सरप्राईझ ” मिळालेले शेतकरी कुटुंबीय आनंदून गेले. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनीही अत्यंत साधेपणा ठेवत शेतकऱ्याच्या घरचे आदरातिथ्य नम्रपणे स्विकारीत ” चहा – पाणी ” घेतले. जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी आज शनिवार दि. १० रोजी जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबाच्या अडीअडचणी जाणून घेणे व त्यांच्या समस्या सोडवून त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देता यावा, याकरिता या कुटुंबाची माहिती जाणून घेण्यासाठी अमळनेर तालुक्यातील जैतपीर, तर धरणगाव तालुक्यातील भोणे गावांना भेटी दिल्या.त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना ‘उभारी’ देण्याचा प्रयत्न केला.
नाशिक विभागाचे विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या संकल्पनेतून नाशिक विभागात आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या कुटुंबासाठी उभारी अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत महसूल विभागातील अधिकारी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या घरी जाऊन भेट देतात व त्या कुटुंबाचे अडीअडचणी समजून घेतात. त्याचबरोबर कुटुंबातील सदस्यांना राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यासाठी माहिती जाणून घेऊन त्यांना प्राधान्याने योजनांचा लाभ देतात.
हे अभियान जळगाव जिल्ह्यात प्रभावीपणे राबविले जावे यासाठी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी स्वतः आज मौजे भोणे, तालुका धरणगाव येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी युवराज पाटील यांच्या घरी जाऊन त्यांच्या वारसांची भेट घेतली. त्यांची आस्थेवाईकपणे चौकशी केली तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ तातडीने देण्याबाबत संबंधितांना सूचना करून त्यांना पुरवठा विभागामार्फत धान्याचे वाटप केले. तसेच वारसांना सिंचन विहीर, संजय गांधी निराधार योजना, बचत गट व शासनाच्या ज्या योजनांच्या लाभासाठी हे कुटूंब पात्र ठरेल त्या योजनांचे लाभ तातडीने देण्याचे सुचित केले. या परिवाराला रब्बी हंगामासाठी शेतीविषयक मदत आवश्यक असून ती मदत कृषी विभागामार्फत देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
यानंतर जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी धरणगाव येथील शेतकरी अनिल कणखरे यांच्या पीक कापणी प्रयोगाच्या प्लॉटला भेट दिली. जिल्हाधिकारी ह्यांनी स्वतः शेतात उभे राहून कापूस वेचणी व कापसाचे मोजमाप करून घेतले. तद्नंतर मौजे भोणे येथे लक्ष्मीनारायण मंदिर परिसरात कृषी विभागाच्या औजार बँकेचे उद्घाटन करण्यात आले. तसेच अमळनेर तालुक्यातील जैतपीर गावात गणसिंग पाटील यांच्या घरी देखील जिल्हाधिकारी राऊत यांनी भेट दिली. तेथे पाटील कुटुंबियांना सानुग्रह अनुदानाचा धनादेश सुपूर्द केला. त्याच्या घराचा प्रश्न प्रलंबित असल्याची माहिती मिळताच जिल्हाधिकाऱ्यांनी पंचायत समितीला आदेश देऊन त्यांना मंजूर असलेल्या घरकुलाच्या प्रश्नी मदत करण्याचे सांगितले. या कुटुंबियांना रेशनचा लाभ मिळत असून, त्यांना पशुसंवर्धन विभागामार्फत स्वयं रोजगार योजनेत समाविष्ट केले जाणार आहे.
याप्रसंगी प्रांताधिकारी विनय गोसावी, तहसीलदार नितीनकुमार देवरे, उपविभागीय कृषी अधिकारी सुभाष जाधव, तालुका कृषी अधिकारी अनिल माळी, मंडळ अधिकारी वनराज पाटील, तलाठी अविनाश पाटील, गणेश पवार आदींसह महसूल व कृषी विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.