जळगाव (प्रतिनिधी) – जेवणानंतर पती-पत्नी रेल्वे मालधक्क्याजवळ शतपावली करीत असताना पाठीमागून भरधाव येणाऱ्या मद्यधुंद दुचाकीस्वाराने धडक दिल्याने पतीचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात दुचाकीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. बुधवारी संशयित दुचाकीचालकास शहर पोलीसांनी अटक केली असून दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे.
अधिक माहिती अशी की, संभाजी धनसिंग पाटील (वय ४६, रा. मुक्ताईनगर) हे जेवणानंतर पत्नी सोबत ३ ऑक्टोबर रात्री ८ वाजेच्या सुमारास रोजी सुरत रेल्वे गेट नवीन मालधक्क्याजवळ शतपावली करीत असताना पाठीमागून भरधाव येणाऱ्या मद्यधुंद दुचाकीस्वाराने धडक दिल्याने संभाजी पाटील यांचा मृत्यू झाला होता. तर दुचाकीवर ट्रिपल सीट फिरणारे तिघे जखमी झाले असून ते तशाच अवस्थेत घटनास्थळावरून पळून गेले होते.
मयत संभाजी पाटील हे बाजार समितीत नोकरीस होते. सेकंदातच घडलेल्या या घटनेमुळे त्यांच्या पत्नी प्रचंड भेदरल्या. पती बेशुद्ध अवस्थेत पडलेले असताना त्यांनी आरडा-ओरड करून त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांचा मृत्यू झाला होता. वर्षा यांनी तत्काळ मोठ्या बहिणीला फोन करून घटनेची माहिती दिली. त्यानंतर काही वेळातच मेहुणे सुभाष जानकीराम गुजर (वय ५४, रा. राधाकृष्णनगर) हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी रिक्षेतून पाटील यांना देवकर महाविद्यालयातील रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून पाटील यांना मयत घोषीत केले होते. शहर पोलीस ठाण्यात सुभाष गुजर यांच्या फिर्यादीवरून अज्ञात दुचाकीचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरूण निकम यांनी पोहेकॉ राजेंद्र परदेशी आणि भास्कर ठाकरे यांनी गुप्त माहितीनुसार संशयित आरोपी दुचाकी चालक समाधान संजय पाटील (वय-२२) रा. वराड सिम ता. धरणगाव याला बुधवारी रात्री राहत्या घरातून अटक केली. संशयित आरोपीची कसून चौकशी सुरू आहे.