नवीमुंबई (वृत्तसंस्था) – अभिनेता संजय दत्त गेल्या काही दिवसांपासून कॅन्सरशी लढा देत आहे. सध्या मुंबईत त्याच्या किमोथरपीचे तिसरे सेशन सुरू आहे. कर्करोगाच्या चौथ्या स्टेजमध्ये संजय दत्त असल्याने त्याचे कुटुंबीय, मित्रपरिवार आणि चाहतेवर्ग त्याच्या प्रकृतीविषयी चिंतेत आहेत. संजय दत्तवर मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दरम्यान संजय दत्तचे काही फोटो समोर आले आहेत आणि ते चाहत्यांची चिंता वाढवणारे आहेत. यामध्ये त्याची प्रकृती खूप खालावल्याचे स्पष्ट जाणवत आहे. उत्तम शरीर असणाऱ्या या आवडत्या अभिनेत्याची अशी अवस्था पाहून अनेकांनी काळजी व्यक्त केली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोंवर चाहत्यांनी संजय दत्तच्या स्वास्थ्यासाठी प्रार्थना केली आहे.
संजय दत्त सध्या दुबईहून मुंबईत परतला आहे. परंतू उपचारासाठी तो न्यूयॉर्कमध्ये देखील जाऊ शकतो, अशी माहिती समोर येते आहे. समोर आलेल्या या फोटोत संजय खूपच हडकुळा आणि खचलेला दिसत आहे. त्याने दाढी काढल्यामुळे त्याचा चेहरा आणखीच थकलेला दिसत आहे.
11 ऑगस्ट रोजी संजयने सोशल मीडियावर असे जाहीर केले होते की, तो त्याच्या मेडिकल ट्रीटमेंटसाठी कामातून ब्रेक घेत आहे. त्याने त्याच्या चाहत्यांना काळजी न करण्याचे आवाहन केले होते. ‘तुमचे प्रेम आणि प्रार्थनांमुळे मी लवकरच परत येईन’, असे देखील तो म्हणाला होता.
या सर्व चढउताराच्या काळात संजय दत्तची पत्नी मान्यता दत्त वेळोवेळी त्याला साथ देताना दिसत आहे. तिने या काळात काही पॉझिटिव्ह पोस्ट करत संजय दत्त आणि त्याच्या चाहत्यांना देखील दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. तिने पोस्ट केलेल्या फोटोंवर संजय दत्त च्या चाहत्यांनी त्याच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली आहे. त्याचप्रमाणे मान्यताला देखील खंबीर राहण्यासाठी पाठिंबा दिला आहे.