जळगाव (प्रतिनिधी) – येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा कोविड रूग्णालयामध्ये अधिष्ठात्यांच्या खूर्चीवर पाय पसरून बसणार्या, दारू पिऊन शिवीगाळ करणार्या बेशिस्त सहाय्यक प्राध्यापक डॉ.चंद्रकांत डांगे यांच्यावर राज्यशासनाच्या वैद्यकीय शिक्षण विभागातर्फे अद्यापही निलंबनाची अथवा कठोर कारवाई न झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
डॉ.डांगे यांनी यापूर्वी तत्कालीन अधिष्ठाता डॉ.भास्कर खैरे यांच्या कार्यकाळात दोन वेळा तर विद्यमान अधिष्ठाता डॉ.जयप्रकाश रामानंद यांच्या काळात सात दिवसापूर्वी अधिष्ठात्यांच्या खूर्चीवर पाय पसरून बसले होते. याचा जाब विचारला असता डॉ.रामानंद यांना दारू पिऊन डॉ.डांगे यांनी शिवीगाळ केली होती.याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीसात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान, राज्याचे वैद्यकीय शिक्षण संचालकांच्या कार्यालयात अधिष्ठाता डॉ.रामानंद यांनी डॉ.डांगेची फाईल जमा केली होती.दरम्यान डॉ.डांगेवर निलंबनाची कारवाई होईल अशी माहिती डॉ.तात्याराव लहाने यांनी दिली होती.मात्र शासनदरबारी अद्यापही डॉ.डांगेच्या कारवाईचे प्रकरण प्रलंबित असून आणखी कोणती अप्रिय घटना घडण्याची राज्यशासन वाट पाहात आहे.असा प्रश्न वैद्यकीय क्षेत्रातून उपस्थित केला जात आहे.







