जळगाव (प्रतिनिधी) – कोरोनाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यातील मंगल कार्यालय, लॉन्स, हॉटेल किंवा वास्तुमधील मॅरेज हॉल किंवा विवाहस्थळावर होणारी गर्दी टाळण्यासाठी अशा सर्व स्थळांवर आजपासून पुढील आदेश येईपर्यंत बंदचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी काढले आहेत.
राज्यातील कोरोनाचा संसर्ग थांबवण्यासाठी राज्य सरकारकडून शैक्षणिक संस्थां, हॉटेल, मॉल, जिम, थिएटरसह अनेक गर्दीची ठिकाणे बंद ठेवण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. शासनाच्या निर्देशानुसार कोरोना आजाराची व्याप्ती वाढू नये यासाठी सार्वजनिक ठिकाणावरील सर्व गर्दीच्या कार्यक्रमास प्रतिबंध घालणेबाबतचे निर्देश शासनस्तरावरुन प्राप्त झालेले आहेत. कोरोना विषाणू हा आजार संसर्गजन्य असल्याने संबधीत आयोजकांनी जिल्हयात गर्दीच्या सार्वजनिक ठिकाणावरील कार्यक्रमांचे उदा. यात्रा, जत्रा, मेळावे, परिषदांसारखे गर्दीचे कार्यक्रम, शाळा व महाविदयालयातील स्नेहसंमेलने, प्रदर्शने व इतर धार्मिक कार्यक्रम, पर्यटन स्थळे व सार्वजनिक उत्सव इत्यादी आयोजन केल्यास कोरोना विषाणूचा मोठया प्रमाणावर फैलाव होऊ शकतो.