जळगाव (प्रतिनिधी) : येथील कोविड रुग्णालयात वादग्रस्त प्राध्यापक चंद्रशेखर डांगे यांनी रविवारी २७ सप्टेंबर रोजी दारूच्या नशेत अधिष्ठाता डॉ. रामानंद यांच्या कक्षात गोंधळ घातला होता. दरम्यान, याप्रकरणी डॉ. डांगे यांच्या प्रकरणाच्या कागदपत्रांची फाईल वैद्यकीय शिक्षण विभागाकडे सोमवारी दुपारी ईमेलवर जमा करण्यात आली आहे.
रविवारी झालेल्या घटनेप्रकरणी आता वैद्यकीय शिक्षण विभागाने अधिष्ठाता कार्यालयाकडून डॉ. डांगे यांची फाईल मागवली होती. ती ईमेलवर जमा करण्यात आली आहे. या फाईलमध्ये डॉ. खैरे यांचा अहवाल, वृत्तपत्र कात्रणे व इतर कागदपत्रे यांचा समावेश आहे.
येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा कोविड रुग्णालयात शरीरक्रिया शास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. डांगे यांनी मे व जून महिन्यात दोन वेळा तत्कालीन अधिष्ठाता यांच्या कक्षात घुसून बेशिस्त वर्तन केले होते. मात्र त्याच्यावर अद्याप कुठलीच कारवाई झाली नाही. तत्कालीन अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांनी त्याच्यावर चौकशी समिती बसवली होती. त्याचा अहवाल आल्यावर डॉ. डांगे याच्यावर कारवाई व्हावी म्हणून वरिष्ठ पातळीवर डॉ. खैरे यांनी अहवाल पाठविला होता.
काही दिवसांपूर्वी डॉ. डांगे हे न सांगता रजेवर गेले. प्रशासन विभाग प्रमुख डॉ. मारुती पोटे यांनी त्याबाबतची माहिती अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांना सांगितली. त्यांनी डॉ. डांगे यांच्यावर डॉ. खैरे यांनी नेमलेल्या चौकशी समितीचा अहवाल मागितला. त्याबाबतचे कारवाई होण्याबाबतचे स्मरणपत्र डॉ. रामानंद हे वरिष्ठांना कळविले होते. याची माहिती डॉ. डांगे यांना मिळाली होती. त्यानंतर रविवारी परत डांगे यांनी प्रताप केला. डॉ. डांगे याच्या निलंबनाची कारवाई आता अंतिम टप्प्यात आली आहे.