मुंबई (वृत्तसंस्था) – अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणी ड्रग्ज कनेक्शन समोर आल्यानंतर शनिवारी ( दि . २६ )एनसीबीकडून अभिनेत्री दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूर आणि सारा अली खान यांची चौकशी करण्यात आली. यात तिन्ही अभिनेत्रींचा जबाब नोंदवून घेण्यात आला आहे. या चौकशीत दीपिकाने ड्रग्ज चॅट केल्याची कबुली दिली, पण ड्रग्ज सेवन केले असल्याचे अमान्य केले असल्याचे समजते.
एनसीबीच्या कार्यालयात शनिवारी दीपिका सकाळी पावणेदहा वाजता चौकशीसाठी हजर झाली. त्यानंतर बरोबर 10 वाजता तिची चौकशी सुरू करण्यात आली. एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यासह एकूण पाच अधिकाऱ्यांनी दीपिकाची चौकशी केली. चौकशी सुरू होण्यापूर्वी एनसीबीने तिचा फोन ताब्यात घेण्यात आला.
तसेच अभिनेत्री श्रद्धा कपूर दुपारी बारा वाजता एनसीबीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर झाली. त्यानंतर एका तासाने सारा अली खानही चौकशीसाठी हजर झाली.
यातच अंमलीपदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) अभिनेत्री दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान आणि रकुल प्रीत सिंह या चार अभिनेत्रींचे मोबाइल फोन्स जप्त केले आहेत. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी यासंदर्भातली माहिती दिली.