डांगे भारी खैरे मात्र घरी ; अजब रुग्णालयाची गजब कहाणी
जळगाव (प्रतिनिधी) – येथील कोविड रुग्णालयात वादग्रस्त शरीरक्रिया शास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक चंद्रशेखर डांगे यांच्यावर शिस्तभंगाची प्रशासनाकडून तब्बल तीन महिन्यात कुठलीच कारवाई न झाल्याने डॉ. डांगे यांनी रविवारी २७ सप्टेंबर रोजी दारूच्या नशेत अधिष्ठाता डॉ. रामानंद यांच्या कक्षात पुन्हा गोंधळ घातला. त्यामुळे त्याच्यावर जिल्हापेठ पोलीस स्थानकात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे.
जून महिन्यात तत्कालीन अधिष्ठाता डॉ. खैरे यांनी डॉ. डांगेवर चौकशी समिती नेमली होती. डॉ. डांगे याच्यावर कारवाई करावी म्हणून त्याचा अहवाल वरिष्ठांना पाठविला होता. गंमतीची गोष्ट म्हणजे, तत्कालीन अधिष्ठाता डॉ. खैरे यांच्यासह ५ जणांवर भुसावळ येथील वृद्ध महिला मृत्यू प्रकरणी राज्य शासनाने जून महिण्याच्या दुसऱ्या आठवड्यात निलंबनाची कारवाई केली. मात्र डॉ. डांगे यांची कारवाईची फाईल मात्र धूळ खात राहिली. त्याचा परिणाम रविवारी पुन्हा दिसून आला.
रविवारी अधिष्ठाता डॉ. रामानंद हे त्यांच्या कक्षात बसले असताना सकाळी १० वाजेच्या सुमारास दारूच्या नशेत काही एक कारण नसताना, तुम्ही कोण आहात, तुमचा मास्क काढा असे म्हणत डॉ. डांगे याने कक्षात येऊन शिवीगाळ केली. तुम्हाला पाहून घेईन अशी दमदाटी केली. त्यावरून डॉ. रामानंद यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात संशयित आरोपी डॉ. चंद्रशेखर डांगे याच्या विरोधात तक्रार दिली. त्यानुसार कलम ५०४,५०६, ५१० नुसार अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. डॉ. डांगे याची वैद्यकीय तपासणी करून त्यांना तंबी देत सोडून देण्यात आले.