मुंबई (वृत्तसंस्था) – इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) दिल्ली येथे झालेल्या ‘एनईसी हॅकॅथॉन’मध्ये दिघी येथील आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारत ऐतिहासिक कामगिरी केली. स्पर्धेतील अनुक्रमे प्रथम, व्दितीय आणि तृतीय अशा तीनही क्रमांकावर मोहर उमटवत एकूण पाच लाखांचे बक्षीस पटकावले आहे.
‘एआयटी’मधून उत्तीर्ण झालेल्या स्वस्तिक श्रीवास्तव, रोहन चौगुले, रजत रावत आणि अनिरुद्ध मुरली यांच्या ‘ड्रुपल’ या संघाने प्रथम क्रमांक मिळवत २.५ लाखाचे बक्षीस जिंकले. व्दितीय क्रमांकाचे बक्षीस (१.५ लाख) ‘एआयटी’मध्ये तृतीय वर्षात शिकणाऱ्या शैलेश, अर्पित, शुभम, शिवम या विद्यार्थ्यांच्या ‘वी कोड’ने या संघाने जिंकले, तर तृतीय क्रमांकाचे पारितोषिक (१ लाख) तृतीय वर्षात शिकणाऱ्या सागर, अशोक या विद्यार्थ्यांच्या ‘वन इन सेंटिलीयन’ या संघाने जिंकले.’एनईसी कॉर्पोरेशन आणि केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या (एमएचआरडी) कॉमन सर्व्हिस सेक्टर (सीएससी) यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतीच ही स्पर्धा आयआयटी दिल्ली येथे पार पडली. ‘ग्रामीण शिक्षणाचे डिजिटायझेशन’ ही या हॅकॅथॉन स्पर्धेची मध्यवर्ती संकल्पना होती.
स्पर्धेसाठी कोणत्याही वयोगटातील जास्तीत जास्त चार सदस्यांच्या संघांना परवानगी देण्यात आली होती. यामध्ये ४००० पेक्षा अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला. आयआयटी, आयआयआयटी, एनआयटी यांसारख्या नामांकित शिक्षणसंस्थांतील विद्यार्थ्यांसह कॉर्पोरेट्समधील तज्ज्ञ प्रोग्रामरचाही समावेश होता.
डिसेंबर २०१९ मध्ये झालेल्या प्राथमिक फेरीतून ४० संघांची निवड करण्यात आली होती. हॅकॅथॉनची अंतिम फेरी ११ व १२ जानेवारी २०२० रोजी दिल्ली येथे झाली. ‘एआयटी’च्या आठपैकी सात संघांची अंतिम फेरीसाठी निवड झाली होती. अनेक प्रतिष्ठित स्पर्धा जिंकून ‘एआयटी’चे संघ गेल्या तीन वर्षांत राष्ट्रीय स्तरावरील हॅकाथॉनमध्ये यश मिळवत आहेत.यामध्ये ‘टीसीएस-पॅन’, आयआयटी हॅकथॉन, बार्कलेज हॅकथॉन, व्हिस्टारा एव्हिएशन हॅकथॉन, एच-अको हॅकाथॉन, हैकर्थ अॅडकाट, एनएसई हॅकथॉन आदी स्पर्धांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल ‘एआयटी’चे संचालक ब्रिगेडियर (निवृत्त) अभय भट, प्राचार्य डॉ. बी. पी. पाटील यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.