भुसावळ (प्रतिनिधी) – तालुक्यात जोरदार पावसामुळे सोयाबीन, ज्वारी, कापसाचे मोठे नुकसान झाले आहे. पंचनामे अद्याप सुरू नाहीत. पंचनाम्याबाबत अधिकारी एकमेकाच्या विभागाकडे बोट दाखवत आहे. कृषी विभागाकडून काहीच हालचाल नाही तर महसूल विभाग म्हणतयं तसे पत्र आले नाही. पंचनामे त्वरित करावेत, अशी सूचना दोन दिवसांपूर्वी खासदार रक्षाताई खडसे यांनी प्रांताधिकारी यांना दिली आहे.
सुचना देवूनही अधिकारी सरकारच्या पत्राची वाट पाहत आहे, ही शोकांतिकाच म्हणावी लागेल. दरम्यान, भुसावळ तहसीलदारांशी याबाबत संपर्क केला असता फोन उचलायलाही त्यांच्याजवळ वेळ नाही. कृषी विभागाची तर गोष्टच न्यारी असून नेमलेल्या गावात कृषी सहाय्यक फिरकतही नाही. तालुका कृषी अधिकारी यांनी थेट शेतकर्यांच्या बांधावर जाण्याची गरज आहे. आमदारांनी याकडे लक्ष वेधले तर बरं होईल अशी अपेक्षा शेतकर्यांनी व्यक्त केली आहे.