मुंबई (वृत्तसंस्था) – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांना आयकर विभागाची नोटीस आली असून निवडणूक पत्राबाबत त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे. यासंदर्भातील माहिती त्यांनी स्वतः पत्रकार परिषदेत दिली होती. मात्र, यावर निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिले आहे.
निवडणूक आयोगाच्या सांगण्यावरून शरद पवारांना आयकर विभागकडून नोटीस दिल्याचा उल्लेख करण्यात आला होता. यावर निवडणूक आयोगाने ही माहिती चुकीची असून भारतीय निवडणूक आयोगाने केंद्रीय प्रत्यक्ष आयकर विभागाला नोटीस जारी करण्यासंबंधी कोणतेही निर्देश दिलेले नाहीत, असे सांगितले आहे.
दरम्यान, निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्राशी संबंधित काही बाबींबाबत प्राप्तीकर विभागाने आपल्याकडे स्पष्टीकरण मागितले असल्याचे शरद पवार यांनी सांगितले आहे. निवडणूक आयोगाच्या सांगण्यावरुन मला ही नोटीस आली. त्याचे उत्तर लवकरच मी देईन. कारण उत्तर दिले नाही तर दिवसाला 10 हजार दंड असल्याचा उल्लेख नोटीसमध्ये आहे, असेही शरद पवार यांनी सांगितले होते. मात्र, यावर आता निवडणूक आयोगाने आपण या संबंधी कोणतेही निर्देश दिले नसल्याचे स्पष्ट केले आहे.