जिल्हा गुन्हेगारीमुक्त करण्याचा निर्धार केला व्यक्त
जळगाव (प्रतिनिधी) – येथील जिल्हा पोलिस अधिक्षक पदाचा पदभार नूतन पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी आज मंगळवारी 22 सप्टेंबर रोजी मावळते पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांच्याकडून 11.20 वाजता स्वीकारला. यावेळी जिल्हा गुन्हेगारीमुक्त करणार असल्याचा निर्धार डॉ.मुंढे यांनी व्यक्त केला.
पदभार घेतेवेळी दोन्ही अप्पर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके, सचिन गोरे, सहाययक पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन उपस्थित होते. सुरवातीला जिल्ह्यातील भौगोलिक आणि गुन्हेगारीविषयी माहिती डॉ. मुंढे यांना डॉ.उगले यांनी दिली. त्यांना कार्यालयीन पत्र आणि पुष्पगुच्छ तसेच सॅनिटायझर देऊन उगले यांनी पदभार सोपविला.
यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले की, जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचे काम केले जाणार आहे. गंभीर गुन्ह्यांवर आणि गुन्हेगारांवर वचक राखण्याचे ध्येय असेल. पोलीस प्रशासन हे जनतेसाठी आहे आणि जनतेसाठी काम करेल, असेही ते म्हणाले.