मुंबई (वृत्तसंस्था) –अलगीकरणाचे छापे असलेल्या चार प्रवाशांना रेल्वे प्रशासनाने उतरवले आहे. मुंबईहून दिल्लीकडे जाणाऱ्या गरीब रथ या रेल्वेगाडीला पालघर येथे थांबा देऊन या गाडीमध्ये असलेल्या चार संशयित करोना रुग्णाना पालघरच्या रेल्वेस्थानकावर उतरविण्यात आले. त्यांच्या हातावर अलगीकरण करण्याचे छापे असल्याने तिकीट तपासनीसांनी रेल्वेचा वापर करण्यास त्यांना मज्जाव केला.पालघरच्या आरोग्य यंत्रणेकडून तपासणी करून त्यांची त्यांच्या मूळ गावी गुजरातमधील सुरत येथे खाजगी वाहनातून रवानगी करण्यात आली. डहाणू येथील कॉटेज रुग्णालयात देखील एका रुग्णाला अलगीकरण वार्डमध्ये दाखल करण्यात आले आहे. या रुग्णांचे नमुने तपासणीसाठी कस्तुरबा रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.