जळगाव (प्रतिनिधी) – जिल्हयातील महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून कोरोनाबाधित रुग्णांना लाभ मिळवून देण्यात राज्यात टॉप टेन मध्ये जळगावचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा कोविड रुग्णालय आठव्या क्रमांकावर आले आहे.

जिल्ह्यात कोरोना साथ रोगाचा धुमाकूळ सुरु आहे. सुमारे १० हजार रुग्ण उपचार घेत आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा कोविड रुग्णालयात ३५६ कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत. गेल्या तीन महिन्यात गरजू व गरीब असलेल्या रुग्णांना महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून लाभ मिळवून दिला आहे. आजपर्यंत १२९ रुग्णांनी या योजनेच्या अंतर्गत उपचार घेतले आहेत. १२ जून २०२० रोजी अधिष्ठाता डॉ.जयप्रकाश रामानंद यांनी पदभार घेण्याआधी एकूण २३ लाभार्थी होते मात्र त्यांच्या शंभर दिवसांच्या कार्यकाळात संख्या १०६ ने वाढून १२९ वर गेली आहेत. त्यामुळे गरिबांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा कोविड रुग्णालयात उपचारासाठी आधार होत आहे.
याबाबत अधिष्ठाता डॉ.जयप्रकाश रामानंद म्हणाले की, कोरोनाबाधित रुग्ण आधीच साथरोगामुळे चिंतेत असतात, त्यात गरीब लोकांना उपचारासाठी आर्थिक मदत म्हणून महात्मा फुले जनआरोग्य योजनेची मदत होत आहे. त्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे राज्यात टॉप टेन मध्ये आले आहे.







