औरंगाबाद (वृत्तसंस्था) – डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे विभाजन करणारा निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावा. या मागणीसाठी आज सकाळी विद्यापीठ गेट समोर एमआयएम विद्यार्थी आघाडी, रिपब्लिकन विद्यार्थी सेना, पँथर विद्यार्थी आघाडीच्या विद्यार्थी संघटनेच्या वतीने आंदोलन करून काळे झेंडे दाखवून निषेध करण्यात आला. यावेळी शिक्षण मंत्री उदय सामंत यांचा ताफा येताच विद्यार्थी संघटना ताफा अडविण्याचा प्रयत्न करणारच तत्पूर्वीच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. तसेच काल जळगाव येथे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत नियोजित दोऱ्यानंतर निघत असताना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीला रोखण्याचा प्रयत्न केला होता.


उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांचा ताफा येताच विद्यार्थी संघटना ताफा अडविण्याचा प्रयत्न करणार तत्पूर्वीच घोषणाबाजी करत असलेल्या विद्यार्थी कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यामध्ये एमआयएम विद्यार्थी आघाडीचे डॉ. कुणाल खरात तसेच सचिन निकम, गुणरत्न सोनवणे, रोहित धनराज, अतुल कांबळे, आवेज शेख या सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी विद्यार्थी संघटनेच्या वतीने काळ्या रंगाचे निवेदन, काळ्या रंगाचे झेंडे दाखवीत निषेध करण्यात आला. यावेळी संघटनाच्या वतीने पदवी परीक्षा व निकालाबाबतचा संभ्रम दूर करण्यात यावे, नामांतर शहीदांचे स्मारक तात्काळ उभारण्यात यावे तसेच सर्व प्रकारचे शैक्षणिक व परीक्षा शुल्क 50% करण्यात यावे, शिवाय मागील काही वर्षापासून राजकीय दृष्ट्या लाभ उठवण्याच्या हेतूने उस्मानाबाद उपकेंद्रास स्वतंत्र विद्यापीठ म्हणून निर्माण करण्याचा घाट घातला जात आहे. मराठवाड्यात जातीय दंगली व्हाव्यात, आंबेडकरी तरुणांचे आयुष्य उध्वस्त व्हावे, भावनिक प्रश्नांभोवती त्यांना गुंतवून ठेवता यावे अशी विचारसरणी असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.







