उदय सामंत यांची पत्रकार परिषदेत माहिती
जळगाव (प्रतिनिधी) – अंतिम वर्षांच्या परीक्षा ऑनलाईन झाल्या तरी या परीक्षांच्या निकालाला विदयार्थ्याला आव्हान देता येणार असून फोटोकॉपी मिळण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल, अशी माहिती
उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान पत्रकार परिषद मात्र केवळ 10 मिनिटात पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे न देता सामंत यांनी आटोपली व निघून गेले.
ते पुढे म्हणाले की, विद्यापीठात सुरू असलेल्या बहिणाबाई अध्यासन केंद्राच्या धर्तीवर संत मुक्ताई अध्यासन केंद्र सुरू करण्यात येईल. याबाबत बुधवारी मंत्रालयात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीत याची घोषणा करणार असून यासाठी आवश्यक निधीची तरतुद देखील करण्यात येणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात शुक्रवारी 18 रोजी कोवीडच्या धर्तीवर लांबलेल्या अंतीम वर्षाच्या परिक्षांबाबत सर्वोच्च न्यायालयाने परिक्षा घेण्याबाबतच्या दिलेल्या निर्णयानुसार परिक्षेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी सामंत आले होते. आढावा घेतल्यानंतर झालेल्या पत्रपरिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार चंद्रकांत पाटील, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत उपस्थित होते. विद्यापीठात सुरू करण्यात येणाऱ्या संत मुक्ताई अध्ययन केंद्रासोबत संत वाड्यमय अध्यासन केंद्र देखील सुरू करण्यात येणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
नियमित पदवीप्रमाणे प्रमाणपत्र
विद्यापीठाच्यावतीने अंतिम वर्षाच्या परिक्षा ऑक्टोंबरमध्ये घेण्यात येणार आहेत. या परिक्षा झाल्यानंतर पदवीप्रमाणपत्र प्राप्त विद्यार्थ्यांना नियमित पदवी प्रमाणपत्र देण्यात येईल; त्यात कोविडचा कुठलाही उल्लेख नसेल. तसेच या परिक्षेत नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांना याच वर्षी म्हणजे नोव्हेंबरमध्ये परिक्षेची पुन्हा संधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.