जळगाव [प्रतिनिधी] – जिल्ह्यात कोविड रुग्णालयांसाठी अद्यापही डॉक्टरांची कमतरता असून त्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे खुली पदभरती अजूनही सुरू आहे. याबाबतची जाहिरात देखील रविवारी प्रशासनाने दिली आहे.
जुलै व ऑगस्ट महिन्यात जिल्हा कोव्हीड रुग्णालयात आणि शासकीय कोविड सेंटरला डॉक्टर, परिचारिका, वोर्डबॉय, फिजिशियन, भुलतज्ज्ञ या कंत्राटी पदभरतीच्या दोन वेळा जाहिराती काढल्या. दुसऱ्या वेळेला दर मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत भवनात मुलाखती सुरू केल्या होत्या.
त्याला अपेक्षित यश मिळाले. परिचारिका, वोर्डबॉय मिळाले. त्यामुळे पूर्वीची पदभरती बंद करण्यात आली आहे. मात्र डॉक्टर, भुलतज्ज्ञ, फिजिशियन यांची अद्यापही जिल्ह्यातील कोविड रुग्णालय व केंद्रात कमतरता जाणवत आहे. यासाठी शल्यचिकित्सकांनी आता दर मंगळवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत इच्छुक डॉक्टरांकडून जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातील राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्षात अर्ज जमा करण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, योग्य वैद्यकीय अधिकारी उपलब्ध होत नसल्याने अनेक ठिकाणी इतर डॉक्टरांवर कामाचा ताण वाढत आहे.








