मुंबई – शिवसेनेला मुंबई कुणाच्या बापाची नाही, मुंबईत येत आहे हिंमत असेल तर अडवून दाखवा असं खुलं आव्हान देणारी अभिनेत्री कंगना रानौत मुंबईत दाखल झाली आहे. शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी कंगनाला मुंबईत येऊन दाखवण्याचं आव्हान दिले होते. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी तर कंगना मुंबईत आल्यास शिवसेनेच्या रणरागिनी तिचं थोबाड फोडतील असा आक्रमक इशारा दिला होता.अभिनेत्री कंगना रनौत मुंबईत दाखल असून छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ती खार या तिच्या निवासस्थानी ती पोहोचली आहे. केंद्र सरकारने कंगनाला ‘वाय प्लस’ दर्जाची सुरक्षा पुरविली आहे. मुंबईत ती जिथे जाईल तिथे तिच्यासोबत सुरक्षारक्षक असतील.

दरम्यान, अभिनेत्री कंगना रानौतचे मुंबईतील मानिकार्णिका फिल्म्स हे कार्यालयात मुंबई महानगरपालिकेने तोडफोड करत कारवाई केली. या कार्यालयात मुंबई महापालिकेकडून सुरू असलेल्या कारवाईला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. या प्रकरणी कंगनाने दाखल केलेल्या याचिकेवर उत्तर दाखल करण्याचे आदेश न्यायालयानं पालिकेला दिले आहेत. त्यामुळे कंगनाला काहीसा दिलासा मिळाला आहे.







