नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – कोरोना विषाणूच्या बाधेतून मुक्त झाल्यानंतर आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ठणठणीत बरे झाले आहेत. प्रकृती सुधारल्याने आज शाह यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग बैठकीला उपस्थिती लावली.

अमित शहा यांना कोरोनानंतरच्या उपचारांसाठी एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना सोमवारी तेथून डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर आज प्रथमच अमित शाह यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीला हजेरी लावली.
यासंदर्भात अमित शाह यांनी ट्विट केले आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत सहभागी झालो. यावेळी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली, असे अमित शाह यांनी ट्विट करून सांगितले.
तत्पूर्वी, १४ ऑगस्टला अमित शाह यांचा अहवाल निगेटिव्ह आला होता. मात्र यानंतरही सातत्याने अंगदुखी, भोवळ यासारखे त्रास जाणवू लागल्याने त्यांना १८ ऑगस्ट रोजी दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांच्यावर कोरोनानंतरचे उपचार करण्यात आले.







