मुंबई (वृत्तसंस्था) – कॉंग्रेसच्या नेत्यांनी काही दिवसांपूर्वी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र पाठवून तातडीने संघटनात्मक पातळीवर सुधारणा करण्याची भूमिका मांडली. पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष असावा, अशी मागणीही त्यांनी केली. पत्रप्रपंच करणारे नेते स्वपक्षीयांच्या टीकेचे धनी बनल्याने कॉंग्रेसमध्ये सर्व काही आलबेल नसल्याच्या चर्चांना उधाण आले होते. अशातच काँग्रेसचे वरिष्ठ नेते गुलाम नबी आझाद आणि कपिल सिब्बल यांनी काँग्रेस सोडून भाजपात सामील व्हावे, असा सल्ला केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दिला आहे.

रामदास आठवले म्हणाले कि, एनडीए पुढील अनेक वर्षे सत्तेत असणार आहे. कपिल सिब्बल, गुलाम नबी आझाद यांच्यासह काँग्रेसच्या अन्य दिग्गज नेत्यांवर भाजपशी हातमिळवणी केल्याचा आरोप करण्यात आला. यामुळे त्या नेत्यांनीही ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यासारखे राजीनामा देऊन भाजपमध्ये सामील झाले पाहिजे, असा सल्ला त्यांनी दिले आहे.
काँग्रेस पक्षांतर्गत अध्यक्ष पदावरून वाद आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कपिल सिब्बल आणि गुलाम नबी आझाद यांच्यावर भाजपकडून काम करत असल्याचा आरोप केला. म्हणूनच मी सिब्बल आणि आझाद यांना काँग्रेसचा राजीनामा देण्याची विनंती करतो. त्यांनी काँग्रेसच्या विस्तारासाठी अनेक वर्षे दिली. परंतु, त्यांनी बाहेर पडत भाजपमध्ये प्रवेश करायला हवा, असेही रामदास आठवले यांनी म्हंटले आहे.
काँग्रेसमध्ये जर अपमान होत असेल तर त्यांनी ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याप्रमाणेच कॉंग्रेसचा हात सोडला पाहिजे. सचिन पायलट यांनीही असेच केले होते, परंतु त्यांनी तडजोड केली. काँग्रेसच्या स्थापनेत हातभार लावणाऱ्या नेत्यांना राहुल गांधींनी दोष देणे चुकीचे आहे, असेही रामदास आठवले यांनी सुनावले आहे.
दरम्यान, मागील काही दिवसांपासून कॉंग्रेसच्या 23 ज्येष्ठ नेत्यांनी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांना पाठवलेले पत्र चर्चेचा आणि पक्षांतर्गत मतभेदांचा विषय बनले आहे. पक्षात संघटनात्मक पातळीवर तातडीने सुधारणा करतानाच पूर्णवेळ अध्यक्ष निवडावा, अशी मागणी त्या पत्रातून करण्यात आली. त्या पत्रावरून कॉंग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत आणि बाहेरही मोठे घमासान झाले. कार्यकारिणी बैठकीत पत्रमोहिमेत सहभागी झालेल्या नेत्यांना लक्ष्य करण्यात आले होते.







