नवी दिल्ली : भारताचे माजी राष्ट्रपती आणि काँग्रेसचे दिग्गज नेते प्रणव मुखर्जी अनंतात विलीन झाले. प्रणव मुखर्जी यांचे पुत्र अभिजीत मुखर्जी यांनी मुखाग्नी दिला. त्यांच्या पार्थिवावर आज (1 सप्टेंबर) लोधी रोडजवळील स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रणव मुखर्जी यांचे सोमवारी (31 ऑगस्ट) निधन झाले. वयाच्या 84 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

प्रणव मुखर्जी यांचे पार्थिव सकाळी 9.30 दरम्यान राहत्या घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. प्रणव मुखर्जी यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्यांच्या अंत्यसंस्कारादरम्यान गाईडलाईन्स पालन केले गेले.यावेळी त्यांचे पुत्र अभिजीत मुखर्जी तसेच इतर कुटुंबियांनी पीपीई किट घातला होता. दुपारी 2 वाजता त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले गेले. त्यांना लष्कराकडून मानवंदना देण्यात आली. प्रणव मुखर्जी यांचे पुत्र अभिजीत मुखर्जी यांनी त्यांना मुखाग्नी दिला.
प्रणव मुखर्जी यांच्या निधनानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस नेते राहुल गांधी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांसह अनेक दिग्गज नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. पंतप्रधान मोदींनी त्यांना पुष्पचक्र अर्पण केलं.त्यांच्या निधनानंतर केंद्र सरकारने देशात सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. त्यामुळे 31 ऑगस्ट 2020 ते 6 सप्टेंबर 2020 या कालावधीत देशातील सर्व सरकारी इमारतींवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर राहिल याची दक्षता घेतली जाणार आहे. त्यानंतर 7 सप्टेंबरपासून राष्ट्रध्वज पूर्ववत चढवला जाईल.
प्रणव मुखर्जींचा अल्पपरिचय
प्रणव मुखर्जी यांना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते म्हणून ओळखले जाते. मुखर्जी यांनी 2012 ते 2017 या कालावधीत भारताचे 13 वे राष्ट्रपती म्हणून काम पाहिले. राष्ट्रपतीपद भूषवण्याआधी 2009 ते 2012 या काळात मनमोहन सिंह सरकारमध्ये त्यांच्याकडे केंद्रीय अर्थमंत्रीपदाची धुरा सांभाळली होती. इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळात 1969 मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर ‘प्रणवदा’ यांची राज्यसभेवर त्यांची नियुक्ती झाली आणि त्यांचा राजकीय प्रवास सुरु झाला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते 2019 मध्ये प्रणव मुखर्जी यांना ‘भारत रत्न’ या सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरवण्यात आले आहे







