मुंबई (वृत्तसंस्था) – रविवारपासून माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची प्रकृती खालावली आहे. फुप्फुसांना झालेल्या संसर्गामुळे ते सेप्टिक शॉकमध्ये असल्याचं त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं. ते कोमात असून, व्हेंटिलेटर सपोर्टवर आहेत अशी माहिती आर्मी हॉस्पिटलने दिली आहे.
10 ऑगस्ट रोजी मुखर्जी यांनी ट्वीट करून कोरोनाची लागण झाल्याची बातमी दिली होती.

त्यांच्यावर मेंदूची शस्त्रक्रिया झाली यानंतर त्यांची कोरोना चाचणी घेण्यात आली असता ते कोव्हिड पॉझिटिव्ह असल्याचं आढळलं होतं.
कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांना नवी दिल्लीतल्या लष्कराच्या आर अॅंड आर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
प्रणव मुखर्जी यांच्या कन्या आणि काँग्रेस नेत्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी ट्वीट करून त्यांच्या वडिलांच्या प्रकृतीची माहिती दिली होती तसंच त्यांच्यासाठी प्रार्थना करणाऱ्यांचे आभार मानले आहेत.
मुखर्जी यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याचं कळताच देशभरातील नागरिकांनी त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना केली आणि त्यांना शुभेच्छा दिल्या.







