मुंबई (वृत्तसंस्था) – कोरोना विषाणूच्या धसक्याने सोमवारी भांडवली बाजारात गुंतवणूकदारांनी विक्रीचा सपाटा सुरूच ठेवला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स सुरुवातीच्या सत्रात १८२३.३४ म्हणजेच पाच टक्क्यांनी घसरून ३२ हजार २८०.१४ अंकांवर स्थिरावला. तसेच राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी सुरुवातीच्या सत्रात ५२२.७५ अंशांनी म्हणजेच ५.२५ टक्क्यांनी घसरून ९ हजार ४३२.४५ अंकांवर कामगिरी करत होता.सेन्सेक्समधील सर्व कंपन्यांनी प्रामुख्याने नऊ टक्क्यांची घसरण नोंदवली आहे. याशिवाय आयसीआयसीआय, एक्सिस बॅंक, टायटन, एचडीएफसी, बजाज फायनान्स, एचडीएफसी बॅंक, टाटा स्टील आदी समभागांमध्ये सपाटून विक्री झाली. यापूर्वी गेल्या आठवड्यात शुक्रवारीही भांडवली बाजाराने नांगी टाकली होती. सुरुवातीच्या सत्रात दोन्ही निर्देशांक दहा टक्क्यांनी घसरले होते. भांडवली बाजारातील गेल्या १२ वर्षांतील सर्वात मोठी घसरण असल्या कारणास्तव शेअर बाजार तब्बल ४५ मिनिटे बंद ठेवावा लागला होता. मात्र, सेन्सेक्स शुक्रवारी १३२५.३४ अंशांनी म्हणजेच ४.०४ टक्क्यांनी वधारत ३४ हजार १०३.४८ अंशांवर बंद झाला, निफ्टीही ३.८१ टक्क्यांनी म्हणजे ३६५.०५ अंशांनी वधारत ९ हजार ९५५.२० अंशांवर बंद झाला होता. रुपयाचीही घसरण – कोरोनाचा फटका रुपयालाही बसला असून डॉलरच्या तुलनेत तो ४२ पैशांनी घसरून ७४.१७ रुपये प्रतिडॉलर अशी कामगिरी करत होता.