पुणे (वृत्तसंस्था) – पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात मिळून करोना रुग्णांची संख्या १६ झाली आहे. तरीही कोणतीही खबरदारी न घेता नागरिकांनी शनिवारवाडा येथे गर्दी केली होती. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी शनिवारवाडा बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शहरातील शाळा, महाविद्यालये, नाट्यगृह, चित्रपटगृह, मॉल्स, ऐतिहासिक वास्तू आदी ठिकाणे बंद ठेवण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. मात्र, रविवारच्या सुट्टीचे औचित्य साधत शहराच्या विविध भागांतून नागरिकांनी शनिवारवाडा या ठिकाणी गर्दी केली होती. परंतु, या ठिकाणी वावरणाऱ्या अनेकांनी कोणतीही खबरदारी घेतली नसल्याचे चित्र होते. यामुळे करोना व्हायरसवर प्रतिबंधात्मक उपाय-योजना म्हणून शनिवारवाडा बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. यामुळे शनिवारवाड्याच्या गेट बंद ठेवण्यात आले आहेत.