जळगाव (प्रतिनिधी) – निकृष्ट दर्जाचे भोजन मिळत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर शहरातल्या कोविड केअर सेंटरमधील जेवणाचा पुरवठादार अखेर बदलण्यात आला आहे.
याबाबत वृत्त असे की, महापालिकेच्या कोविड केअर सेंटरमधील चहा, नाष्टा व जेवणाबाबत मोठ्या प्रमाणावर तक्रारी करण्यात आलेल्या होत्या. मनपा हद्दीतील कोरोना केअर सेंटरमधील रुग्णांना चहा, नाष्टा व दोन वेळेचे जेवण देण्याचा मक्ता इंडियन रेडक्रॉस सोसायटीला देण्यात आला होता. त्याबद्दल अनेक रुग्ण व महापालिकेतील नगरसेवकांनी तक्रारी केल्या होत्या. परिणामी दिनेश टाटिया या कंत्राटदाराला हा ठेका दिला होता. मात्र या कंत्राटदाराबाबतही तक्रारी करण्यात आल्या होत्या.
यानंतर महापालिकेने नव्याने निविदा काढून दोन वेळेचा चहा, नाष्टा, दोन्ही वेळेचे जेवण याबाबत प्रस्ताव मागविले होते. यात सर्वात कमी दर नोंदविणार्या लालजी केटरर्स यांना ही निविदा देण्यात आली. यामध्ये कोरोना रुग्णांना दोन वेळेचा चहा, बॉइल अंडे, फळे, दोन्ही वेळेचे जेवण मिळणार आहे. दरम्यान, पूर्वी एका रुग्णांचा प्रती दिवसाचा खर्च १५० रुपये होता. तथापि, आता नवीन कंत्राटदार हा १४० रूपये प्रति दिन/प्रती रूग्ण या दराने हा पुरवठा करणार आहे.







