मुंबई (वृत्तसंस्था) – उद्धव ठाकरे यांच्या ध्वजारोहणाच्या फोटोवरुन भाजपाचे नेते निलेश राणे यांनी टोला लगावला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, ७४ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज वर्षा या शासकीय निवासस्थानी ध्वजारोहण केले. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचा हा पहिलाच ध्वजारोहण सोहळा ठरला. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी रश्मी ठाकरे देखील उपस्थित होत्या.
मात्र या कार्यक्रमादरम्यान काढलेल्या एका फोटोवरून निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. राणे यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या या फोटोमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सॅल्यूट करताना दिसत असून त्यांच्यामागे झेंडा आहे. यावरूनच निशाणा साधत राणे यांनी, ‘झेंडा मागे आहे मग मुख्यमंत्री सॅल्युट कोणाला मारतायं समोर CBI दिसली की काय,’ असे टिकात्मक ट्विट केले आहे.
विशेष म्हणजे सुशांत सिंह राजपूत यांच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपवण्यावरून राजकारण चांगलंच तापलं आहे. निलेश राणे यांचे वडील व भाजप नेते नारायण राणे यांनी यापूर्वी सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात बड्या नेत्याला वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप केला होता.
दरम्यान, यावेळी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘खेड्यापाड्यापर्यंत आरोग्य सेवा पुरवली जाईल तसंच सरकार म्हणून शेतकरी आणि कामगारांच हित जोपासलं जाईल.’ असं म्हंटलं. यावेळी विशेष आमंत्रित काही कोविड योद्धे, डॉक्टर, नर्सेस उपस्थित होते. तसेच मुख्य सचिव, पोलीस महासंचालक आणि उच्च स्तरीय अधिकारी यांच्यासोबत मुख्यमंत्री यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि माजी राज्य मंत्री दीपक केसरकर उपस्थित होते.
‘कोरोना रुग्णांना बरे करण्यासाठी अहोरात्र झटणारे डॉक्टर्स,नर्सेस, वैद्यकीय आणि पोलिस यंत्रणेत काम करणारे कर्मचारी, स्वच्छता दूत हे खरे कोविड योद्धे आहेत,आपल्यासाठी स्वातंत्र्य योद्धे आहेत. या काळातही न डगमगता ते समर्पित भावनेने सेवा देत आहेत. कोरोनातून बरे झालेले नागरिकही लढवय्ये आहेत,’ असेही मुख्यमंत्री म्हणाले.







