भुसावळ ;- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याच सोबत सामाजिक भावनेतून नागरिकांनी सुद्धा कोरोना विषाणू आजाराबाबत जनजागृती केली पाहिजे, दक्षता घेतली तर या विषानुवर सहज मात करता येईल नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन दिनांक १६ मार्च २०२० रोजी कोरोना आजार लक्षणे व उपाययोजना वर आधारित माहितीपत्रकांचे वाटप करतांना उपस्थितांना शिवसेनेचे तालुका संघटक प्रा.धिरज पाटील यांनी केले.
प्रसंगी प्रा. धिरज पाटील, विशाल ठोके, यतीन ढाके, रमेश भोई, शांताराम कोळी, विकास तावडे, सीताराम भंगाळे, भूषण भोई व नागरिक उपस्थित होते.
माहिती पत्रकातून कोरोना विषाणू आजाराची लक्षणे:
साध्या सर्दी-खोकल्यापासून ते सार्स किंवा मर्स यांसारख्या गंभीर आजारांसाठी कोरोना विषाणू कारणीभूत असतात. आजाराची लक्षणे ही मुख्यत: श्वसनसंस्थेशी निगडित म्हणजेच इन्फ्लुएन्झा आजारासारखीच असतात. सर्दी, खोकला, श्वास घ्यायला त्रास होणे, निमोनिया, काहीवेळा मूत्रपिंड निकामी होणे अशी लक्षणे साधारणपणे आढळतात. सर्वसाधारणपणे हा आजार हवेवाटे शिंकण्यातून व खोकल्यातून जे थेंब बाहेर पडतात, त्यातून पसरतो अशी माहिती माहिती पत्रकातून श्री नगर, भोई नगर, गणेश कॉलनी, खळवाडी, अयोध्या नगर, मोहित नगर, हुडको कॉलोनी, अष्टविनायक कॉलनी, जुना सातारा परिसरात वाटप करण्यात आली.
खबरदारी घेतल्यास कोरोना दूर राहील :
रुग्णास त्याच्या लक्षणानुसार उपचार केले जात असून, आरोग्याच्या हितासाठी नागरिकांनी पुढील खबरदारी घ्यावी. श्वसनसंस्थेचे विकार असणाऱ्या व्यक्तीशी संपर्क ठेवताना संसर्ग न होण्याची काळजी घ्यावी. हात वारंवार धुवावे. शिंकताना, खोकताना नाका-तोंडावर रुमाल अथवा टिश्यूपेपर धरावा. अर्धवट शिजलेले, कच्चे मास खाऊ नये. फळे, भाज्या धुवूनच खाव्यात. श्वसनास त्रास होणाऱ्या व्यक्तींनी हा त्रास कोणत्या आजारामुळे होतो आहे हे स्पष्ट होत नसल्यास व रुग्णाने बाधित देशात प्रवास केला असल्यास; तसेच प्रतिकारशक्ती कमी असलेल्या व्यक्ती आणि ज्यांनी नुकताच बाधित देशात प्रवास केला आहे, अशा व्यक्तींनी ताबडतोब वैद्यकीय सल्ला घ्यावा.
सोशल माध्यमाद्वारे पसरणाऱ्या अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये: विशाल ठोके
कोरोनासंदर्भात अर्धवट माहिती असणारे, चुकीचे, भीती उत्पन्न करणारे संदेश कोणीही सोशल मीडियावर पाठवू नयेत. विविध अधिकृत स्रोतांकडून खात्री करुन घेतल्याशिवाय याविषयीचे संदेश पुढे पाठवू नयेत, तसेच आवश्यक असल्यास हेल्पलाईनला फोन करून शंका निरसन करून घ्यावे. गर्दीत जाणे टाळावे, तसेच सामाजिक शिष्टाचार पाळून दक्षता बाळगावी, परंतु भीती बाळगू नका, असे आवाहन विशाल ठोके यांनी केले आहे. कोरोना विषाणू आजाराची लक्षणे, उपाययोजना, सद्य:स्थिती आणि नागरिकांनी घ्यावयाची खबरदारी याबाबतही त्यांनी माहिती दिली.