जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील शिव कॉलनी उड्डाण पुलाजवळ असणारे एसबीआयचे एटीएम फोडून तब्बल १४ लाख ४१ हजारांची रोकड लंपास करणार्यांच्या मुसक्या जिल्हा पेठ पोलिसांनी आवळल्या आहेत.

याबाबत वृत्त असे की, याबाबत वृत्त असे की, शिवकॉलनी रेल्वे उड्डाण पुलाच्या अलीकडे स्टेट बँकेची शाखा आहे. याच्या बाहेर एक एटीएम सेंटर आहे. त्यात कॅश भरणा आणि एटीएम अशी दोन एटीएमची मशीन आहेत. १२ जुलै रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास हे दोन्ही एटीएम तोडले असल्याचे या परिसरातील रहिवाशांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने याची माहिती पोलिसांना दिली. यात संबंधीत एटीएम हे गॅस कटरने तोडून चोरट्यांनी यामध्ये असणारी १४ लाख ४१ हजार रूपयांची कॅश लांबवून पोबारा केल्याचे स्पष्ट झाले होते. तर या एटीएममध्ये असणारी सात लाख रूपयांची रोकड मात्र चोरट्यांना न दिल्याने सुरक्षित राहिली होती.
दरम्यान पोलीसांनी बँकेने लावलेले सीसीटीव्ही फुटेज तपासणी केली असता. यात तीन जण तोंडाला रूमाल बांधून मध्यरात्री १ वाजून ५५ मिनीटांनी दाखल झाले. दोन्ही एमटीएम गॅस कटरने फोडून रोकड घेवून तीने चोरटे २ वाजून ३३ मिनीटांनी एटीएमच्या बाहेर पडले. यावेळी सोबत चारचाकी गाडी असल्याची माहिती समोर आली होती. भर वस्तीमधील एटीएम फोडून तब्बल १४ लाखांची रक्कम लंपास करण्यात आल्यामुळे खळबळ उडाली होती. या संदर्भात पोलिसांनी कसून चौकशी सुरू केली होती.
दरम्यान, उत्तरप्रदेश व हरियाणाच्या सीमेवर यातील दोघांना पकडण्यात आले असून तिसरा मात्र निसटण्यात यशस्वी झाला आहे. निसार शफुर सैफी (वय-३८) आणि त्याचा लहान भाऊ इरफान शफुर सैफी (वय-२९) रा. पलवल हरीयाणा यांना अटक केली आहे. तर तिसरा मुख्य सुत्रधार कुरशीद मदारी सैफी रा. अंघोला ता.पलवल (हरीयाणा) हा फरार आहे. या दोन्ही आरोपींनी जळगावात एटीएम फोडल्याची कबुली दिली. यामुळे तेथील पोलिसांनी जिल्हापेठ स्थानकाशी संपर्क साधला. यानंतर केलेल्या चौकशीत एसबीआयचे एटीएम फोडणारे हेच दोघे असल्याची खात्री पटल्याने या दोन्ही आरोपींनी जिल्हापेठ स्थानकाच्या पथकाच्या ताब्यामध्ये देण्यात आले आहे. लक्षणीय बाब म्हणजे हे दोन्ही सख्खे भाऊ आहेत. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा या संदर्भात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.







