नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – देशातील करोनामुक्त होणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यातून सक्रिय बाधितांपेक्षा करोनामुक्त झालेल्यांची संख्या दुपटीवर पोहोचली आहे. देशात सध्या 5 लाख 86 हजारांपेक्षा अधिक सक्रिय बाधित आहेत. तर करोना संसर्गातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 12 लाख 30 हजारांवर पोहोचली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी संबंधित आकडेवारी सादर केली. देशातील बाधित बरे होण्याचे प्रमाण 66.31 टक्क्यांवर पोहोचले आहे. देशभरात आतापर्यंत दगावलेल्या बाधितांची संख्या 40 हजारांच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. तसे असले तरी देशातील करोना मृत्यूदरही लक्षणीय घट झाली आहे. तो दर सध्या 2.10 टक्के इतका आहे.
देशात लागू करण्यात आलेल्या पहिल्या लॉकडाऊनपासून
करोनामृत्यूचे हे प्रमाण सर्वांत कमी ठरले आहे. दरम्यान, देशातील काही नव्या भागांत करोनाचा फैलाव आढळून आला आहे. त्यानंतरही देशातील एकूण बाधितांपैकी 82 टक्के 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांपुरतेच मर्यादित असल्याचे स्पष्ट झाले आहे.
देशातील 50 जिल्ह्यांमध्ये एकूण बाधितांपैकी 66 टक्के बाधितांची नोंद झाली आहे. देशात करोना संसर्गामुळे मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये पुरुषांचे प्रमाण महिलांपेक्षा अधिक आहे. करोनाबाधेमुळे दगावलेल्यांमध्ये 68 टक्के पुरुष, तर 32 टक्के महिला आहेत. मृतांपैकी निम्मे 60 वर्षे आणि त्यावरील वयोगटातील आहेत. 45 ते 60 वर्षे वयोगटातील 37 टक्के तर 26 ते 44 वर्षे वयोगटातील 11 टक्के बाधितांचा मृतांमध्ये समावेश आहे.







