अयोध्या (वृत्तसंस्था) – हा आनंदाचा क्षण आहे, एक संकल्प केला होता, तो संकल्प आज पूर्ण झाला आहे, याचा आनंद आहे. इथं मंदिर बनणार आहे, मात्र आपल्याला आपल्या मनात मंदिराचं निर्माण करावं लागणार आहे. सर्वांना आपलं मानणारा धर्म आपल्याला उभा करायचा आहे. या मंदिराच्या पूर्ण होण्याआधी आपल्याला आपलं मनमंदिर उभं करायचं आहे, असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलं आहे.

आज अनेक लोकं इथं येऊ इच्छित होते. मात्र ते येऊ शकत नाहीत. आडवाणीजी देखील हा सोहळा पाहत आहेत. आत्मनिर्भर बनण्यासाठी ज्या गोष्टीची आवश्यकता होती त्याची सुरुवात आज झाली आहे. या आनंदाच्या क्षणी मी सर्वांचं अभिनंदन करतो, असं मोहन भागवत म्हणाले.
गेल्या 30 वर्षांच्या कठीण संघर्षाचं फळ आज मिळालं आहे. एवढ्या वर्षांचा संघर्ष कधीही विसरता येणार नाही. आज सर्वांच्या आनंदाचा क्षण आहे. देशातील सर्वांमध्ये प्रभू श्रीराम आहेत. राम मंदिराच्या उभारणीचं काम सर्वांना वाटून देण्यात आले आहे. परंतु आपल्याला आपल्या मनात अयोध्या सजवायची आहे. या ठिकाणी जसं मंदिर बनेल तसं मनातील अयोध्या बनायला हवी. हे मंदिर उभं राहण्यापूर्वी मनातील मंदिर उभं राहायला पाहिजे, असं सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले.
अयोध्येत रामजन्मभूमी स्थळी प्रभू रामाच्या मंदिर निर्माणाचं भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते पार पडलं. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी संबोधित केलं.







