अयोध्या (वृत्तसंस्था) – देशातील ऐतिहासिक राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याची तयारी आता पूर्ण झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते थोड्याच वेळात राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडणार आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्वतः या कार्यक्रमाच्या तयारीची पाहणी केली.

दरम्यान, या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी योगगुरू बाबा रामदेव अयोध्येत दाखल झाले आहेत. बाबा रामदेव अयोध्येत दाखल होताच त्यांनी हनुमानगढी येथे पूजा केली आहे. यावेळेस बोलताना बाबा रामदेव म्हणाले की, 5 ऑगस्ट हा ऐतिहासिक दिवस असून आपल्या कित्येक पिढ्या आजचा दिवस लक्षात ठेवतील. आज आपण रामराज्यात प्रवेश करत आहोत, असा आशावादही त्यांनी बोलताना व्यक्त केला आहे.
यासोहळ्यासाठी मंदिर परिसर आणि अयोध्येत कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. तर दुसरीकडे करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शक सूचनांचे पालनही करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जवळपास तीन तास अयोध्या दौऱ्यावर असतील. यामध्ये मंदिराचे दर्शन, पूजा अशा कार्यक्रमांचा समावेश आहे.







