काबुल (वृत्तसंस्था) – इसिसच्या खोरसान शाखेच्या गुप्तचर संघटनेचा प्रमुख असदुल्लाह ओराकझाई हा अफगाणी सुरक्षा रक्षकांनी केलेल्या कारवाईमध्ये ठार झाला आहे. अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा संचलनालय अर्था ‘एनडीएस’ने याबाबतची माहिती दिली आहे. ओराकझाई हा मूळ पाकिस्तानी होता आणि तो अफगाणिस्तानमध्ये इसिसच्या खोरसान शाखेसाठी गुप्तहेर म्हणून काम करत होता. अफगाणिस्तानमधील नानगरहार प्रांतातील जलालाबाद शहराजवळ केलेल्या कारवाईत तो मारला गेला.

अफगाणिस्तानातील लष्करी तळ आणि नागरिकांच्या महत्वाच्या ठिकाणांवरील भीषण हल्ल्यांचा कट रचण्यामध्ये ओराकझाई सहभागी होता. पाकिस्तानमधील अखेल ओराकझाई एजन्सीचा हस्तक असलेल्या झियाउररेहमान अर्थात असदुल्लाह ओराकझाईचा ‘एनडीएस’च्या विशेष युनिटने खात्मा केला आहे, असे ‘एनडीएस’ने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
मे महिन्यात अफगाणिस्तानच्या सुरक्षा दलांनी इसिसचा कमांडर झिया उल हक म्हणजेच अबु ओमर खोरसानी याला आणि इस्लामिक स्टेटच्या दोन प्रमुख म्होरक्यांना अटक केली होती. ‘एनडीएस’च्या विशेष युनिटने 4 एप्रिलला केलेल्या धडक कारवाईमध्ये अब्दुल्लाह ओरकझाईलाही अटक केल्याचे जाहीर केले होते.
अब्दुल्लाह ओरकझाईला अस्लम फारुखी म्हणूनही ओळखले जात असे. त्याच्या बरोबर इसिसच्या अन्य 19 जणांनाही अटक करण्यात आली होती. यामध्ये कारी झहिद आणि सैफुल्लाह उर्फ अबू तलाहा या दोन प्रमुख म्होरक्यांचाही समावेश होता.







