मुंबई (वृत्तसंस्था) – रक्षाबंधनाचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असतानाच आज मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या वाट्याला मोठं दुःख आलं आहे. पेडणेकर यांचे मोठे बंधू सुनील कदम यांचा आज कोरोना उपचारांदरम्यान मृत्यू झाला. गेल्या सात दिवसांपासून सुनील यांच्यावर नायर रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.

कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या आपल्या भावाला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी पेडणेकर यांनी एक भावनिक कविता शेअर केली आहे.
तत्पूर्वी, एप्रिल महिन्यात मुंबई महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षातील कर्मचाऱ्यांना करोना झाल्याची माहिती समोर आल्यानंतर महापौर किशोरी पेडणेकर १४ दिवस होम क्वारंटाइन झाल्या होत्या. त्यांच्या मोठ्या भावाला म्हणजेच सुनील कदम यांनाही करोनाची लागण झाली होती.
मागील सात दिवसांपासून नायर रुग्णालयात सुनील कदम यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र अखेर शनिवारी सकाळी सुनील कदम यांची प्राणज्योत मालवली.







