बीड : शेतकरी पित्याने टॅब घेऊन न दिल्यामुळे आत्महत्या केलेल्या बीडमधील दहावीच्या विद्यार्थ्याला 81 टक्के गुण मिळाले. परीक्षेत मिळालेलं घवघवीत यश पाहण्यासाठी अभिषेक या जगात नसल्याने संत दाम्पत्य गहिवरले. अभिषेकचे गुण ऐकून आईने अक्षरशः हंबरडा फोडला.
बीडच्या गेवराई तालुक्यातील भोजगावमध्ये राहणाऱ्या अभिषेक संत या विद्यार्थ्याने जून महिन्यात आत्महत्या केली होती. ऑनलाईन शिक्षणासाठी शेतकरी पित्याने टॅब घेऊन दिला नाही म्हणून अभिषेक नाराज झाला होता. अभिषेकने घरातच गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली होती.
अभिषेक दहावीच्या वर्गात शिक्षण घेत होता. काल जाहीर झालेल्या दहावीच्या निकालात अभिषेकने 81 टक्के गुण मिळवल्याचे समोर आले. त्यामुळे शेतात काम करणाऱ्या आई वडिलांना त्याचा निकाल ऐकून अश्रू अनावर झाले.
नेमकं काय झालं होतं?
खरीप हंगामाची लगबग सुरु होती. त्याच वेळी अभिषेकने शेतकरी वडिलांना टॅब घेऊन देण्याचा तगादा लावला होता. खत बी बियाणे घेण्यासाठीच शेतकऱ्याने उसनवारी पैसे आणले होते. त्यावेळी पेरणी झाल्यावर टॅब घेऊन देतो, असं शेतकरी बापाने पोराला सांगितलं होतं. मात्र हताश झालेल्या आणि हट्ट धरलेल्या मुलाने धीर सोडून, थेट गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली.