जळगाव ;- दादावाडीतील कृष्णपुरा सोसायटीत राहणाऱ्या २१ वर्षीय तरूणीने राहत्या घरात दोरीने गळफास घेतल्याची घटना मंगळवारी रात्री उघडकीस आली. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सायली बाळासाहेब पाटील (वय-२१) रा. कृष्णपूरा सोसायटी, दादावाडी असे मयत तरूणीचे नाव अहे. सायली पाटील या तरुणीने मैदानी खेळांचा ‘अॅथलेटिक्स’ चा क्लास लावण्याचा तगादा आईवडीलांकडे लावला होता. लॉकडाऊन व कोरोनाच्या आजाराचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने वडीलांनी तुर्तास क्लास लावण्यास नकार दिला. कोरोनाचा संसर्ग कमी झाला की तेव्हा लावू असे सांगितले असता, त्यावर सायली नाराज झाली होती. गेल्या दोन दिवसांपासून ती नाराज होती.
मंगळवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास दादावाडी परिसरात विद्यूत पुरवठा बंद झाला होता. त्यावेळी सायली व तिची आई घरात एकट्या होत्या. तर वडील बाळासाहेब पाटील व भाऊ विश्वेस पाटील हे मेडिकल दुकानावर होते. लाईट गेल्याने सायलीची आई घराबाहेर आल्या व गल्लीतील महिलांशी गप्पा मारत होत्या. त्यावेळी सायली घरात एकटी असतांना तीने बेडरूममध्ये जावून झोक्याच्या दोरीने गळफास घेतला. दरम्यान साडेसात वाजेनंतर सायलीची आई घरात आल्यानंतर मुलीने गळफास घेतल्याचे उघडकीस आले. कुटुंबियासह गल्लीतील नागरिकांनी सायलीला जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकिय अधिकारी यांनी मृत घोषीत केले. पोलीसांच्या प्राथमिक माहितीनुसार आत्महत्येचे कारण समोर आलेले नाही. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.