सूरत;- | गुजरातमधील सूरत शहरातच्या एका महाविद्यालयात शिकत असलेल्या दोन विद्यार्थिनींनी अंतराळात एक लघुग्रह शोधून काढण्याची किमया केलीये. हा लघुग्रह मंगळाच्या कक्षेत फिरणारा आहे. महत्त्वाचं म्हणजे नासाने देखील या मुलींच्या शोधाला दुजोरा दिलाय. या नव्या लघुग्रहाचे नाव HLV2514 देण्यात आलंय.

14 वर्षीय वैदेही बेकारिया आणि राधिका लखानी अशा या दोन विद्यार्थिनींची नावं आहेत. वैदेही आणि राधिका या पीपी सावनी चैतन्य विद्या संकुलात शिकतात. या दोघी अंतरिक्षात संशोधन करणाऱ्या नासाशी संबंधित आंतरराष्ट्रीय भारतीय लघुग्रह शोध मोहिमेशी संबंधित आहेत. या दोन विद्यार्थिनींनी आपल्या खगोलीय अभ्यासाचे प्रशिक्षण SPACE संस्थेत घेतलंय. नासाने इमेलच्या माध्यमातून यांच्या शोधाला दुजोरा दिलाय.
ऑल इंडिया अॅस्टरॉईड सर्च कॅम्पेनचे संचालक डॉक्टर पॅट्रिट मिलर यांच्या सांगण्यानुसार, हा लघुग्रह मंगळ ग्रहाच्या जवळ आहे. काही वर्षांनंतर तो पृथ्वीला देखील क्रॉस करू शकतो. तुमच्या या शोधासाठी तुमचं अभिनंदन असंही त्यांनी इमेलमध्ये लिहिलं आहे.
वैदेही भावनगर जिल्ह्यात तर राधिका ही अमरेली जिल्ह्यात राहते. या दोघींच्या म्हणण्याप्रमाणे, ‘आम्ही अंतरिक्षात सुमारे २० पदार्थांना चिन्हित केलेलं. त्यांपैकी हा एक लकी निघाला. सध्या आम्ही या लघुग्रहाला तात्पुरतं नाव दिलंय. त्याचं परिवलन पूर्ण झाल्यानंतर या लघुग्रहाला नाव देण्याची संधी आम्हाला मिळणार आहे.’







