नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित ‘राफेल’ विमानांच्या पहिल्या तुकडीने फ्रान्समधून भारतात येण्यासाठी उड्डाण केले आहे. पहिल्या तुकडीत एकूण पाच विमाने आहेत. ही विमाने बुधवारी २९ जुलै रोजी भारतात लँडिंग करणार आहेत. हरयाणामधील अंबाला एअर फोर्स स्टेशनवर ही विमाने उतरणार आहेत. २०१६ साली भारताने फ्रान्स सरकार बरोबर ३६ राफेल फायटर विमाने खरेदी करण्याचा ५९ हजार कोटींचा करार केला आहे. त्यातील पहिली पाच विमानांची तुकडी या आठवड्यात देशात दाखल होणार आहे.
राफेल फायटर जेटच्या हाताळणीसाठी भारतीय वायू दलाचे बारा वैमानिक आणि इंजिनिअरींग क्रूला पूर्णपणे प्रशिक्षित करण्यात आले आहे. उड्डाणवस्थेत असतानाच या विमानांमध्ये इंधन भरण्यात येईल तसेच अंबालामध्ये येण्यापूर्वी ही विमाने यूएईमधील फ्रेंच तळावर लँडींग करतील. फ्रान्समधील तळावरुन उड्डाण करण्यापूर्वी फ्रान्समधील भारतीय राजदूताने भारतीय वैमानिकांबरोबर चर्चा केली.