नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – स्वातंत्र्यदिन (15 ऑगस्ट) साजरा करताना गर्दी टाळावी. तसेच, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, अशा सूचना केंद्र सरकारने सर्व राज्यांना दिल्या आहेत. तसेच, स्वातंत्र्यदिनी होणाऱ्या सोहळ्यांना विशेष निमंत्रित म्हणून करोनायोद्ध्यांना बोलावण्याचेही आवाहन केले आहे.

करोना संकट विचारात घेऊन केंद्रीय गृह मंत्रालयाने स्वातंत्र्यदिन साजरा करण्याविषयी मार्गदर्शक सूचना जारी केल्या. त्यामध्ये गर्दी होणार नाही अशा पद्धतीने सोहळ्यांचे आयोजन करण्यास सांगण्यात आले आहे. सोहळ्यांवेळी प्रामुख्याने तंत्रज्ञानावर भर दिला जावा. अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशातून सोहळे वेबकास्ट केले जावेत.
स्वातंत्र्यदिन सोहळ्यांच्या माध्यमातून आत्मनिर्भर भारत संकल्पनेचा संदेश दिला जावा. सोहळ्यांमध्ये सहभागी होणाऱ्यांनी मास्क परिधान करावेत, असे सूचनांमध्ये नमूद करण्यात आले आहे.
करोनाविरोधी लढ्यात डॉक्टर, आरोग्य आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांनी उल्लेखनीय योगदान दिले आहे. त्यामुळे त्या करोनायोद्ध्यांना सोहळ्यांसाठी आमंत्रित केले जावे. करोना संसर्गावर मात केलेल्यांनाही बोलावले जावे, असे गृह मंत्रालयाने म्हटले आहे.







