कारागृह सुरक्षारक्षकाशी झटापट करून बडतर्फ पोलिसासह तिघांचे पलायन
पुरेसा स्टाफचा अभाव , क्षमतेपेक्षा जास्त कैदी असल्याने कैदी झाले फरार

जळगाव –जळगाव जिल्हा कारागृहातून आज सकाळी ७ वाजेच्या सुमारास कैद्यांना बाहेर काढण्याच्या वेळेस आत कैदी असलेल्या बडतर्फ पोलीस यांच्यासह तिघांनी कारागृहातील आतमधील गेटजवळ असलेल्या सुरक्षारक्षकाशी हुज्जत घालून झटापट करून तात्काळ मुख्य दरवाजाबाहेर येत दुचाकीवर आधीच तयार असलेल्या चौथ्या साथीदारासोबत दुचाकीवर बसून आरोपींनी पलायन केल्याची सिनेस्टाइल घटना घडली होती . याची खबर मिळताच पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील , जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बापूराव रोहम, तसेच जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अकबर पटेल यांच्यासह पोलिस पथक दाखल झाले होते. दरम्यान आधीही दोन कैद्यांनी भिंतीवरून उडी मारून पळ काढल्याची घटना घडली होती . दरम्यान पोलिस आरोपींचा कसून शोध घेत आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि , जळगाव जिल्हा कारागृहातून आज सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास कैदी सुशील अशोक मगरे (पहूर, ता.जामनेर), गौरव विजय पाटील रा.शिरूड नाका, तांबापूरा, अमळनेर), सागर संजय पाटील (पैलाड अमळनेर) यांनी सुरक्षारक्षक ऑनड्यूटी असतांना तिघांनी मारहाण केली आणि पिस्तूलाचा धाक दाखवत मुख्यप्रवेशद्वारातून पळ काढला. यावेळी जिल्हा कारागृहाच्या बाहेर जगदीश पुंडलिक पाटील रा. पिंपळकोठा ता.पारोळा हा दुचाकी घेवून उभा होता. तिघे कैदी जिल्हा कारागृहाच्या बाहेर पडताच जगदीश पाटील यांच्या दुचाकीवर बसून फरार झाले.
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केली कारागृहाची पाहणी
घटनेची माहिती कळताच जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना माहिती कळताच त्यांनी कारागृहाला भेट दिली . यावेळी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना पालकमंत्री म्हणाले कि , कारागृहात ४०० च्यावर कैदी असून दोनशे कैद्यांची क्षमता आहे . तसेच डीवायएसपी दर्जाच्या अधिकाऱयांची येथे रेग्युलर पोस्टिंग नसून कैद्यांच्या मानाने पोलिसांचा स्टाफही अपुरा आहे . तसेच मागे वस्ती असल्याने कैद्यांसाठी वस्तू येऊ शकते . सीसीटीव्ही कॅमेरे , तटबंदी , पोलिसांचा अपुरा स्टाफ आदींचा अभाव असल्याने अशा घटना घडत आहे. घटना घडली तेव्हा बंद्यांच्या सुटकेची वेळ होती . फरार आरोपीना काही तासांतच अटक केली जाईल असे आश्वासन माध्यम प्रतिनिधींशी बोलतांना पालकमंत्र्यांनी केले.
सुरक्षारक्षकाशी झटपट करून कैदी फरार -प्रभारी कारागृह अधिक्षक
फरार झालेले आरोपी हे आर्म ऍक्ट आणि ३०७ च्या गुन्ह्यातील असून सकाळी सव्वा सात वाजेच्या सुमारास घडली असून कैदी क्षमतेपेक्षा जास्त आणि अपुरा पोलीस बंदोबस्त यामुळे हि घटना घडल्याचे प्रभारी कारागृह अधीक्षक राजेंद्र मरळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले . दरम्यान फरार आरोपींविरुद्ध जिल्हापेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.







