नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – भारत आणि चीन यांच्यात काही दिवसांपासून तणावाचे वातावरण आहे. यावरून विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका देखील केली होती. त्यानंतर चीनसोबतच्या संबंधावर सातत्याने भूमिका मांडत असलेले काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारला सुनावले आहे. ‘मी चीनबद्दल वारंवार इशारा देत आहे, पण ते नाकारले जात आहे,’ असे सांगत राहुल गांधी यांनी करोना व अर्थव्यवस्थेविषयी दिलेल्या संकटाची आठवण करून दिली आहे.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे मागील काही दिवसांपासून सातत्यानं चीनच्या परराष्ट्र धोरणाविषयी बोलत आहेत. व्हिडीओच्या माध्यमातून ते चीनच्या विस्तारवादाविषयी आपले म्हणणे मांडत आहे. या मुद्यावरून राहुल गांधी यांनी एक ट्विट केले असून, त्यातून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
‘मी त्यांना (मोदी सरकार) कॊरोना आणि अर्थव्यवस्थेबद्दल इशारा देत राहिलो. पण, त्यांनी तो नाकारला. त्यानंतर आपत्ती आली. आताही मी त्यांना चीनबद्दल इशारा देत आहे. हा इशाराही ते फेटाळून लावत आहेत,’ असे राहुल गांधी यांनी ट्विट करून म्हटले आहे. राहुल गांधी यांनी २३ जुलै रोजी एक व्हिडीओ ट्विट केला होता. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वत:ची प्रतिमा बनवण्यावर १०० टक्के लक्ष केंद्रीत केले आहे. भारतातल्या ताब्यात घेतलेल्या संस्था तेच काम करण्यामध्ये व्यस्त आहेत. एका माणसाची प्रतिमा राष्ट्रीय दृष्टीकोनाला पर्याय असू शकत नाही’ असे राहुल गांधी यांनी टि्वट केलेल्या व्हिडीओमध्ये म्हटले होते.







