मुंबईः कोरोना रुग्णवाढीचा वेग कमी व्हावा तसेच वाढत असलेल्या रुग्णांना हाताळण्यासाठी तयारी करण्याकरिता वेळ मिळावा यासाठी प्रशासन लॉकडाऊन हा पर्याय वापरत आहे. आजाराचा संसर्ग आटोक्यात ठेवण्यासाठी नागरिकांनी पुरेशी खबरदारी घेणे आवश्यक आहे. मात्र संसर्ग वेगाने पसरत असेल आणि परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये असे वाटत असेल तर आवश्यक तिथे लॉकडाऊन (lockdown) लावण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील प्रशासनाला परवानगी दिली आहे.

लॉकडाऊन लावून परिस्थिती नियंत्रणात ठेवता येईल, अशी खात्री वाटत असल्यास प्रशासनाने कोरोनावर मात करण्यासाठी लॉकडाऊन लागू करावे. हा निर्णय घेताना कुणाच्या दडपणाखाली येऊ नका. आवश्यकतेनुसार लॉकडाऊन लावा, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. कोरोना संकटाचा सामना करत असलेल्या प्रशासनाची मुख्यमंत्र्यांनी पाठराखण केली.
राज्यात ठिकठिकाणी स्थानिक पातळीवर सुरू असलेले अनेक लॉकडाऊन एक-दोन दिवसांत संपणार आहे. या पार्श्वभूमीवर पुन्हा लॉकडाऊन नको अशी मागणी काही नागरी संघटनांनी घेतली. काँग्रेसच्या काही नेत्यांनीही लॉकडाऊनला विरोध सुरू केला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि पालिका आयुक्तांशी चर्चा केली. याप्रसंगी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख उपस्थित होते.
राज्याची अर्थव्यवस्था संकटात सापडून चालणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले. त्यांनी कोणत्याही परिस्थितीत शहरी भागांतील कोरोना ग्रामीण भागात पसरू देऊ नका, आवश्यक त्या उपाययोजना करा अशा सूचना प्रशासनाला दिल्या.
महाराष्ट्रातील प्रयोगशाळा १३० पर्यंत वाढवल्या आहेत. अँटीजेन चाचण्यांसाठी आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत. धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय कार्यक्रमांवरील बंदी कायम आहे. गर्दी टाळण्यासाठी नागरिकांना सातत्याने आवाहन केले जात आहे. सण साधेपणाने घरातल्या घरात आणि शक्य तिथे प्रतिकात्मक पद्धतीने साजरे करण्याचेही आवाहन करण्यात आल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. त्यांनी मुंबईतले धारावी मॉडेल इतरत्र राबवून संसर्ग आटोक्यात ठेवणे आवश्यक असल्याचे सांगितले.
हॉस्पिटलमध्ये अव्वाच्या सव्वा बिल आकारणी होऊ नये यासाठी प्रत्येक हॉस्पिटलमध्ये एक अधिकारी नेमण्याची सूचना आरोग्यमंत्री आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री यांनी सर्व जिल्हाधिकारी आणि आयुक्तांना दिली. ट्रस्टच्या हॉस्पिटलमध्ये दहा टक्के गरीब रुग्णांवर विनामूल्य उपचार केले जातात की नाही हे तपासावे असेही आरोग्यमंत्री म्हणाले.
महाराष्ट्रात पाच हजार व्हेंटिलेटर सज्ज आहेत पण राज्यात फक्त ५४० रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्र्यांनी बैठकीत दिली. त्यांनी प्रशासनाला कोरोना चाचण्यांची संख्या वाढवा, असे सांगितले.
औरंगाबाद, मुंबई, ठाणे, पालघर, रायगडमध्ये रुग्णांचे प्रमाण राज्यात जास्त आहे. या भागांमधील कोरोना चाचण्या आणखी वाढवण्याची आवश्यकता आहे, असे वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव डॉ. संजय मुखर्जी म्हणाले.







