नवी दिल्ली ;- अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या भूमिपूजनाचा मूहूर्त निश्चत होत आहे. रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासची काल (१८ जुलै) बैठक पार पडली. ३ किंवा ५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासच्यावतीने तसे पत्र देखील पाठवण्यात आले आहे. मात्र, नक्की कोणत्या दिवशी भूमिपूजन करायचे या संदर्भातील अंतिम निर्णय पंतप्रधान कार्यालयाकडून घेतला जाणार आहे.

फेब्रुवारी महिन्यात या ट्रस्टची बैठक होऊन रामनवमीपर्यंत काम सुरू होणार होते. मात्र, कोरोनाच्या संकटामुळे ते लांबणीवर गेले. तसेच, ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आता मंदिर निर्मितीच्या कामाला सुरुवात होईल. कोर्टाच्या आदेशानुसार स्थापन झालेल्या राम मंदिर निर्माण ट्रस्टमध्ये एकूण पंधरा सदस्य आहेत. त्यापैकी १२ सदस्यांनी काल अयोध्येतल्या या बैठकीला प्रत्यक्ष हजेरी लावली तर ३ सदस्य व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर होते.
पंतप्रधानांचे माजी मुख्य सचिव रुपेंद्र मिश्रा यांचादेखील या समितीत समावेश आहे. मंदिराच्या एकूण बांधकामाबद्दलची चर्चा सुद्धा या बैठकीत झाल्याचे कळते आहे. त्यानुसार तीन ऐवजी पाच घुमट असावेत आणि मंदिराची उंची १६१ फूट असावी अशी चर्चाही या बैठकीत झाली आहे.
मंदिर एकूण दोन मजल्यांचं असेल. मंदिरातील पहिल्या मजल्यावर प्रभू श्रीरामाची मूर्ती असेल. मंदिराच्या दुसऱ्या मजल्यावर प्रभू श्रीरामाचा दरबार असेल. मंदिराच्या घुमटावर धर्मध्वजाची उभारणी केली जाणार आहे. एकूण 212 खांबावर मंदिराची उभारणी केली जाणार आहे. नव्या राम मंदिराची लांबी 275 फुट, उंची 135 फुट, रुंदी 125 फुट इतकी असेल. एकूण 36 हजार 450 चौरस फुट इतक्या क्षेत्रफळावर मंदिर उभारलं जाणार आहे.







