कर्नाटकच्या आरोग्यमंत्र्यांचे अजब विधान
बंगळुरू – देशातील कोरोना विषाणूचा फैलाव प्रचंड वेगाने वाढत असताना काही राज्यांमध्ये परिस्थिती अधिकाधिक चिंताजनक परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यातच सुरुवातीच्या काही काळाता कोरोना नियंत्रणात राहिलेल्या कर्नाटकमध्ये गेल्या काही दिवसांत कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढली आहे. त्यानंतर आता कर्नाटकचे आरोग्यमंत्री बी. श्रीरामुलू यांनी अजब विधान केले आहे. कोरोनापासून बचावासाठी आता आम्हाला केवळ देवच मदत करू शकतो, अशा शब्दात हतबलता व्यक्त केली आहे.
कर्नाटक सरकार सुरुवातीच्या काळात कोरोनाला रोखण्यात कमालीचे यशस्वी ठरले होते. मात्र नंतर राज्यातील बाधितांचा आकडा झपाट्याने वाढला असून, आता राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ४७ हजारांवर पोहोचली आहे. त्यामुळे महाराष्ट्र (२.७५ लाख), तामिळनाडू (१.५१ लाख) आणि दिल्ली (१.१६ लाख) या देशातील सर्वाधिक प्रभावित राज्यांनंतर कर्नाटक चौथ्या स्थानावर पोहोचले आहे.
कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर श्रीरामुलू म्हणाले की, जगभरात कोरोना विषाणूमुळे बाधित झालेल्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे आपण सर्वांनी जागरुक राहण्याची गरज आहे. सत्ताधारी असो वा विरोधक, गरीब असो वा श्रीमंत हा विषाणू कुणासोबतही भेदभाव करू शकत नाही. राज्यातील परिस्थिती पाहता पुढील दोन महिने रुग्ण वाढीचा दर चढाच राहण्याची शक्यता आहे. आता सरकार किंवा मंत्र्यांच्या बेजबाबदारपणामुळे हा आजार फैलावत असल्याचा दावा कुणी करू शकतो. पण आता आपल्याला केवळ देवच वाचवू शकतो.







