मुंबई | देशभरातील पेट्रोल व डिझेलचे दर आभाळाला भिडले आहेत. राज्यातील अमरावती, औरंगाबाद, परभणी व सोलापूर या चार जिल्ह्यांत डिझेलच्या दरांनी आज तब्बल प्रतिलीटर ८० रूपयांचा पल्ला पार केला आहे.
अमरावती ८०.७२, औरंगाबाद ८०.४९, परभणी ८०.१२ तर सोलापुरात प्रतिलीटर डिझेलसाठी ८०.०५ रूपये मोजावे लागणार आहेत. पेट्रोल व डिझेलच्या या दरवाढीनं सामान्य नागरिकांच्या खिशाला मात्र कात्री लागणार आहे.
मुंबई शहरातही डिझेलचे भाव चांगलेच वधारले आहेत. मुंबईत डिझेल ७९.४० तर ठाणे आणि नवी मुंबईतील डिझेलच्या दरांनी ७९.५० रूपयांचा आकडा पार केला आहे.
दरम्यान, राज्यातील कोरोनाचा विळखा दिवसागणिक वाढत चालला आहे. दीर्घ लाॅकडाऊनच्या काळात नागरिकांना बराच आर्थिक फटका सहन करावा लागला. आता पेट्रोल व डिझेलच्या दरातील वाढीनं पुन्हा नागरिकांच्या चिंतेत वाढ झाल्याचं पहायला मिळत आहे.







